नगर : 572 शाळांमध्ये शैक्षणिक सर्वेक्षण ! कोरोनानंतरच्या गुणवत्तेचा आरसा दिसणार | पुढारी

नगर : 572 शाळांमध्ये शैक्षणिक सर्वेक्षण ! कोरोनानंतरच्या गुणवत्तेचा आरसा दिसणार

नगर; पुढारी वृत्तसेवा : दोन महिन्यांपूर्वी ‘असर’ने शिक्षण विभागाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातल्यानंतर आता 17 मार्चला राज्यभरात एकाचवेळी तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे संपादणूक सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी नगर जिल्ह्यातील 572 शाळांची निवड करण्यात आली असून, क्षेत्रीय अन्वेषक विद्यार्थ्यांची भाषा, गणिताची लेखी परीक्षा घेऊन तो अहवाल राज्य शासनास सादर करणार आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण केले जाते.

यापूर्वी साधारणतः 2013-14 मध्ये हे सर्वेक्षण झाले होते. त्यानंतर याचा शासनालाही विसर पडल्याचे सांगितले जाते. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी ‘असर’ या खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल पुढे आला होता. त्यात तिसरीला गेलेल्या विद्यार्थ्याला वाचता येत नव्हते, गणिताची आकडेमोडही जमत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर खरोखरच आता शासनालाही अध्ययन संपादणूक सर्वेक्षण गरजेचे असल्याची आठवण झाली आहे. डाएटचे भगवान खार्के आणि शिक्षणाधिकारी भास्कर पाटील हे या सर्वेक्षणासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

572 क्षेत्रीय अन्वेषकांची नियुक्ती
जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित शाळांमध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी ‘डाएट’ व शिक्षण विभागाकडून प्रत्येक केंद्रावर एक क्षेत्रीय अन्वेषक नेमण्यात येत आहे. त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावर समन्वयकाची नेमणूक केलेली आहे.

नगरची गुणवत्ता समजणार
कोरोनानंतर घसरलेली शिक्षणाची गाडी रुळावर आलेली आहे की नाही, हे या अहवालातून पुढे येणार आहे. विद्यार्थ्यांची ही परीक्षा झाल्यानंतर ते पेपर एकत्रित करून स्कॅन केले जातील. त्यानंतर साधारणतः दीड महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण राज्यभरातील गुणवत्तेचा हा अहवाल एकाचवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या अहवालानुसार शासन शैक्षणिक धोरण ठरविणार आहे. त्यात काही बदलही करणार आहे. दरम्यान, असरच्या अहवालावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे या अहवालाकडे विशेष लक्ष असणार आहे.

राज्यभरात 17 मार्चला सर्वेक्षण

संपूर्ण राज्यभरात 17 मार्च रोजी अध्ययन संपादणूक सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये तिसरी आणि पाचवीच्या मुलांना भाषा 20 आणि गणित 25 प्रश्न सोडविण्यास दिले जातील. तर आठवीच्या मुलांना भाषा 25 अणि गणित 35 प्रश्न दिले जाणार आहेत. त्यासाठी 90 ते 120 मिनिटांचा कालावधी असणार आहे. त्यानंतर हे पेपर जमा करून पुढे पाठविले जातील.

Back to top button