श्रीरामपूर : शिवभोजन केंद्रचालकांचे अनुदान रखडले | पुढारी

श्रीरामपूर : शिवभोजन केंद्रचालकांचे अनुदान रखडले

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूरसह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांचे अनुदान गेल्या 6 महिन्यांपासून रखडले आहे. गरजूंना घास भरविण्याची वेळ चक्क शिवभोजन केंद्र चालकांवरच येऊन पडली आहे. केंद्र चालकांचे भांडवल संपुष्टात येत असल्याने ते पूर्णतः मेटाकोटीस आले आहेत. शिव भोजन केंद्र चालकांची सहनशीलता आता जवळपास संपत आली आहे. त्यामुळे पुढील काळात अत्यंत वाजवी दरात मिळत असलेल्या भोजनानं गरिबांचं पोट कसं भरणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरिबांना अत्यंत वाजवी दरात जेवणाचा आस्वाद घेता यावा, यासाठी अत्यंत उपयुक्त आणि लाभदायक शिवभोजन योजना सुरू केली होती. या योजनेनुसार जिल्ह्यात 48 शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात 36 केंद्र सुरू आहे. श्रीरामपूर शहरात दोन शिवभोजन केंद्र सुरू आहेत. शिवभोजन केंद्रांमध्ये सध्या सुरू असलेल्या 36 केंद्रांमधून तीन हजार 872 थाळ्यांचे वाटप गरजू नागरिकांनी केले जाते.

मागील दोन महिन्यांत दोन लाख 32 हजार 320 थाळ्यांनी गरिबांचे पोट भरले आहे. केंद्रचालकांना गेल्या 6 महिन्यांचे शासकीय अनुदान मिळालेले नाही. यामुळे ही योजना आता रखडते किंवा काय? असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे उभा राहिला आहे. शिवभोजन योजना सतत चालू रहावी, यासाठी शासनाने मात्र याकडे गंभीरतेने पाहणे गरजेचे असल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. राज्यात आता सत्ता पालट झाल्याने सदरची योजना बंद पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोरोना काळात वर्षभर शिवभोजन गोरगरीब यांच्यासाठी मोफत होते. सध्याही आपल्याकडे अनेकजण शिवभोजन घेण्यासाठी येतात. त्यांच्याकडे पैसेही नसतात. रुग्णांबरोबर येणारे अनेक नातेवाईक तसेच काच, पत्रा वेचणारे वृद्ध, मूकबधिर, मतिमंद, अपंग असे अनेक जण या शिवभोजनाचा आस्वाद घेतात. शासनाकडून अनुदान मिळण्यासाठी थोडासा उशीर होत असला तरी गरिबांच्या मुखात घास घालण्याचा आपला प्रयत्न आहे.
                                                       सुरेश साठे, श्रीरामपूर

 

Back to top button