राहुरी : भूमिगत गटार योजनेला प्रशासकीय मंजुरी | पुढारी

राहुरी : भूमिगत गटार योजनेला प्रशासकीय मंजुरी

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी शहराला अत्यंत गरजेची असलेली भूमीगत गटार योजनेसाठी केलेला पाठपुरावा यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. भूमीगत गटारीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत नगरविकास खात्याचे प्रधान सचिव यांच्यामवेत बैठक घेत योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा केला. लवकरच भूमीगत गटार योजनेला मंजुरी प्राप्त होणार असल्याची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली. आ. तनपुरे म्हणाले की, राहुरी, नगर व पाथर्डी मतदारसंघाचा आमदार म्हणून मी जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले.

राहुरी शहरासह मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेल्या होत्या. आमदार झाल्यानंतर मतदारांच्या कृपेने सहा खात्याचे राज्यमंत्री पद मिळाले. मंत्रीपदाचा वापर केवळ जनहितासाठीच केला. राहुरी शहरामध्ये विकासाचे ध्येय घेऊन कोट्यवधी रुपयांचे विकासात्मक कामे केली. मंत्रीपदाच्या माध्यमातून शहरामध्ये पाणी योजनेची अडचण सोडवित असताना भूमीगत गटार योजनेसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला.

नगरविकास खात्याचे राज्यमंत्रीपद असल्याने भूमीगत गटार योजनेसाठी योजना प्रकल्प अहवाल सादर करण्याकरिता एजन्सी नेमणूक केली. त्यास प्रकल्पाबाबत सर्वेक्षण करीत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. वेळोवेळी संबंधित कामाशी निगडीत अधिकारी, नगरविकास खात्याचे अधिकारी, एजन्सीबरोबर बैठका घेऊन तांत्रिकदृष्ट्या सक्षम व शहारासाठी लाभदायी ठरेल, असा अहवाल दोन महिन्यात एजन्सीने सादर केला. अहवालाबाबत चर्चा होऊन एसटीपी प्रकल्पाची जागा कंटूर सर्व्हेनुसार बदल करण्यात आला.

त्यानंतर सुधारित अहवाल महाराष्ट्र जीवन प्रधिकरणच्या अहमदनगर कार्यालयात अंतिम अहवाल सादर झाला. त्यानंतर नाशिक येथील मुख्य अभियंत्यांशी वेळोवेळी संपर्क साधत भूमीगत गटार योजनेच्या अहवालास तांत्रिक मान्यता मिळावी असा पाठपुरावा सुरू असतानाच राज्यात सत्ताबदल झाला. महाविकास आघाडी शासनाची सत्ता गेल्यानंतर भूमीगत गटार योजनेचा प्रश्न प्रलंबित पडला होता.

आमदार म्हणून या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केल्याने काल 9 मार्च रोजी नगर विकास खात्याचे प्रधान सचिव सोनिया सेठी यांच्या दालनात प्रकल्प मंजुरीची बैठक संपन्न झाली. परिणामी लवकरच राहुरीच्या भूमिगत गटार योजनेला मंजुरी प्राप्त होणार आहे. प्रशासकीय मंजुरीनंतर राहुरी शहरामध्ये भूमीगत गटार योजनेचे प्रत्यक्ष कामास प्रारंभ होऊन लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या पाठपुराव्याला मूर्त स्वरूप प्राप्त होणार असल्याचा आनंद होत असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.

Back to top button