आयुक्त बाहेर या.. पाणीपट्टी भरतो, पाणी द्या! सावेडी उपनगराचा पाणीपुरवठा विस्कळीत | पुढारी

आयुक्त बाहेर या.. पाणीपट्टी भरतो, पाणी द्या! सावेडी उपनगराचा पाणीपुरवठा विस्कळीत

नगर; पुढारी वृत्तसेवा : सावेडी उपनगराचा गेल्या आठ महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मनपा प्रशासनास वारंवार निवेदने देऊनही अद्याप प्रश्न सुटला नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पाणीप्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे. तपोवन व सावेडी रोड परिसरातील भागाला अमृत पाणी योजना सुरू करून त्यावर कनेक्शन द्यावे, याचबरोबर इंजिनियर, वॉलमन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी मोर्चावेळी प्रशासनाकडे केली.

महापालिका विरोधीपक्षनेते संपत बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली सावेडी उपनगराच्या पाणी प्रश्नासाठी महापालिकेवर महिलांचा हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका दिपाली बारस्कर, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, नगरसेविका मीनाताई चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार आदींसह प्रभागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, पाणी पुरवठा अधिकारी परिमल निकम, इंजिनियर रोहिदास सातपुते आंदोलनकर्त्यांच्या आक्रोशाला समोरे जावे लागले. नगरसेवक डॉ. सागर बोरुडे म्हणाले, प्रभाग एकमधील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी मनपा प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, अद्याप प्रशासनाने त्यावर कुठलीही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे आज मनपावर महिलांनी हंडा मोर्चा काढला. प्रशासनाने 31 मार्चपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

उपायुक्त यशवंत डांगे म्हणाले, अमृत पाणी योजना 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येईल. वसंतटेकडी मुख्य संतुलन टाकीच्या नॉन रिटर्न व्हॉलचे 24 आटे चालू ठेवण्यात येतील. नागापूर पपिंग स्टेशन येथे पूर्वीप्रमाणे पाणी वाटपाच्या सूचना केल्या आहेत. कंत्राटी (मानधना वरील) कर्मचार्‍यांचे पगार वेळेवर देण्यात येतील. कायमस्वरूपी कर्मचार्‍यांच्या नेमणुकीबाबत आस्थापना विभागाला आदेशित केले आहे. प्रभागातील पाण्याचे वेळ, लिकेज, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांचेकडील शट डाउन, वादळामुळे लाईट समस्या या सर्व कारणामुळे पाण्याच्या वेळेमध्ये बदल होतो. याबाबत दक्षता घेण्यात येईल.

महिलांचा आक्रोश
महिलांनी अमृत योजना सुरू करा… सुरू करा अमृत योजना सुरू करा… धिक्कार असो… धिक्कार असो… मनपाचा धिक्कार असो… मनपा प्रशासनाचे करायचे काय खाली डोके वर पाय… पाणीपट्टी भरतो पाणी द्या… असे म्हणून आक्रोश करीत आयुक्तांच्या दालनासमोर महिलांनी ठिय्या दिला.

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होऊन कमी दाबाने होतो. नागरिकांना जर आपण वेळेवर व मुबलक पाणीपुरवठा देऊ शकत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. ठेकेदारामार्फत वॉलमन घेतले पण त्यांचा वेळेवर पगार होत नसल्याने पाणी सोडण्यास दिरंगाई करतात. आता प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास वेगळ्या पद्धतीने आक्रमक शैलीत आंदोलन करण्यात येईल.

                                                    – संपत बारस्कर,विरोधी पक्षनेता

उपायुक्त यशवंत डांगे म्हणाले, अमृत अभियानाअंतर्गत पाणी पुरवठा योजना 31 मार्च 2023 अखेर पूर्ण करण्यात येईल. त्यावर कनेक्शन देऊन पाणीपुरवठा करण्यात येईल. प्रभागातील विविध दुरूस्तीची कामाकरिता साहित्याबाबत संबंधित ठेकेदाराला सूचनाही देण्यात आल्या आहेत.
                                                         – यशवंत डांगे, उपायुक्त

Back to top button