कर्जत : मातीच्या ढिगार्‍याखाली दबून बालकाचा मृत्यू; बोगदा करणे बेतले जीवावर | पुढारी

कर्जत : मातीच्या ढिगार्‍याखाली दबून बालकाचा मृत्यू; बोगदा करणे बेतले जीवावर

कर्जत(नगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सुपा येथे मातीच्या ढिगार्‍याखाली दबल्याने गुदमरून बालकाचा दुर्दैव मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.9) दुपारी तालुक्यातील सुपा गावाच्या शिवारात घडली. जितेन दीपक यादव (वय 8) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी तालुक्यातील सुपा गावाच्या शिवारात जितेन दीपक यादव, त्याचा भाऊ हेमंत दीपक यादव आणि त्यांचा एक भाऊ असे तिघे मातीच्या ढिगार्‍याजवळ खेळत होते. यावेळी मातीच्या ढिगार्‍यामधून बोगदा करण्याचे तिघांनी ठरविले. मोठा ढिगारा असल्याने बोगदा तयार केला व त्यामधून पलीकडे जाऊ असे ठरले. हा बोगदा तयार करत करत जितेन व हेमंत मातीच्या ढिगार्‍याच्या आत गेले. त्यांचा लहान भाऊ मात्र मागेच थांबला होता.

बोगदा तयार करत असतानाच पोकळी तयार झाली व वरून सर्व माती या दोघांच्या अंगावर पडली. ते दोघेही ढिगार्‍याखाली दबले गेले. हा सर्व प्रकार पाहून त्यांचा लहान भाऊ दूरवर असलेल्या नातेवाईकांकडे पळत गेला व त्याने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर सर्वजण धावत आले व त्यांनी मातीच्या ढिगार्‍याखाली दबलेले नितीन व हेमंत यांना बाहेर काढले. मात्र, गुदमरून जितेन याचा जागेवरच मृत्यू झाला होता. मात्र, हेमंत बेशुद्ध पडलेला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकरणी मिरजगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी दिली.

Back to top button