

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : शेतमालाच्या पडलेल्या भावामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या बळी राजावर निसर्गही कोपला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे बळीराजाचे आता पुरते कंबरडे मोडले आहे. संगमनेर तालुक्यामध्ये सध्या शेत कर्यांची गहू, हरभरा काढण्याची लगबग सुरू आहे. अनेक भागांमध्ये शेतकर्यांनी गव्हाची सोंगणी करून शेतामध्येच पेंढ्या बांधून ठेवल्या आहेत तर काही भागामध्ये गहू पिकाची सोंगणी सुरू आहे. तर काहींचा गहू शेतातच उभा आहे. या अशी परिस्थिती असताना गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकर्यांचे पिकांचे होत्याचे नव्हते झाले. वादळी वार्यासह गारांच्या पावसाने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा चांगलाच संकटात सापडला आहे.
संगमनेर तालुक्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने सर्वाधिक गहू, टोमॅटो, कांदा व द्राक्षे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय वादळी वार्यामुळे तालुक्यातील अनेक भागात विजेचे खांब उन्मळून पडले. त्यामुळे विद्युत वाहक तारा जमिनीवर आल्या असून घुलेवाडीला विद्युत वाहिनीचा जबर धक्का बसून लक्ष्मण आव्हाड यांची कालवड आणि दोन दुभती जनावरेही दगावली असल्याचे समजते आहे. या पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे.
पिकांवर रोगांचाही प्रादुर्भाव होणार
वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु या पावसामुळे पिकांवर वेगवेगळ्या रोगांचाही प्रादुर्भाव होणार असल्याने बळीराजावर एकामागून एक अस्मानी संकट येण्याची श्रृंखला ही कायम असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शासनाने तातडीने शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.