

संदीप रोडे :
नगर : अजित पवार-बाळासाहेब थोरातांची पाठ फिरताच अहमदनगर जिल्हा बँक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पाडण्याची यशस्वी खेळी खेळत भाजपने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार आणि काँग्रेसचे आ. थोरातांना 'जोर का झटका' दिला. पवार-थोरातांचा शब्द प्रमाण मानणार्या जिल्ह्यातील रथी महारथींना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जादूची कांडी फिरविल्यागत गळाला लावत फोडाफोडीची कला लिलया पार पाडली. सोबतीला राजकीय डावपेचात माहिर असलेले शिवाजी कर्डिले असल्याने भाजपने जिल्हा बँकेवर झेंडा फडकाविला. शिवाजी कर्डिलेे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले हा जिल्ह्यातील दिग्गज राजकारण्यांना जसा अनपेक्षित धक्का तसा पवार-थोरात जोडीला हदरा मानला जातो. साखरसम्राट आणि दिग्गज संचालक फोडत भाजपने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांची चुणूक दाखवून दिली. जिल्हा बँकेच्या राजकारणाचे त'रंग' आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत उमटल्यास आश्चर्य वाटू नये इतकेच !
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक राज्यात नावलौकिक अन् अव्वलस्थानी असलेली बँक. 2020 मध्ये बँकेची निवडणूक झाली. त्यावेळी 'सहकारात राजकारण आणायचे नाही' असे म्हणत पक्षीय जोडे बाजूला ठेवत सहकारातील दिग्गज एकत्र आले. तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटा विरुद्ध थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी अशी लढत झाली. महाविकास आघाडीने बाजी मारली. सर्वाधिक संचालक राष्ट्रवादीचे असल्याने फॉर्म्युल्यानुसार अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर उपाध्यक्ष पद काँग्रेसच्या वाट्याला आले. अध्यक्ष उदय शेळके यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर बुधवारी निवडणूक झाली. सर्वाधिक संचालक असतानाही महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आ.चंद्रशेखर घुले यांना चितपट करत भाजपचे माजी आ. शिवाजी कर्डिले हे अध्यक्ष पदाच्या खुर्चीत विराजमान झाले.
जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे 10, काँग्रेस 4 आणि भाजप-विखे समर्थक 6 असे बलाबल. सहा संचालकांच्या जोरावर बँकेची सत्ता हस्तगत करणे अशक्यप्राय गोष्ट. पण हीच अशक्य बाब शक्य करून दाखवत विखे-कर्डिले जोडगोळीने भाजपचा झेंडा फडकाविला. नुसता फडकाविलाच नाही तर मविआला आगामी राजकीय उलथापालथीचे संकेतही दिले. मंगळवारीच विरोधी पक्षनेते अजित पवार, बाळासाहेब थोरात यांनी मविआ संचालकांची बैठक घेतली. या बैठकीत अध्यक्ष पदाचा उमेदवार ठरेल असे वाटत असतानाच त्याचा चेंडू शरद पवार यांच्या कोर्टात गेला.
पवारांचे दूत पक्षनिरीक्षक अंकुश काकडे हे घुलेंच्या नावाचा सांगावा घेऊन बुधवारी नगरला पोहचले. तोपर्यंत राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते, पण त्याचा थांगपत्ता मविआला लागला नाही. पवार काका-पुतणेही निश्चिंत होते. हीच संधी साधत भाजपचे शिवाजी कर्डिले यांनी डाव टाकला. मविआतील नाराज हेरून त्यांच्याशी बोलणी केली. मंत्री विखे पाटील यांची दमदार साथ असल्याने राजकीय पटलावर कर्डिलेंनी सोंगट्या टाकल्या, याच सोंगट्या कर्डिलेंना विजयापर्यंत घेऊन गेल्या.
पवारांच्या शब्दाला डावलून तब्बल पाच संचालक फुटले. झंझट नको म्हणत एकाने मत बाद केले तर चौघांनी भाजपच्या पारड्यात मत'दान' केले. फुटलेले संचालक साधेसुधे नाहीत, तर रथीमहारथी आहेत. त्या-त्या भागातील जनमतांचा कौल त्यांच्या बाजूने झुकलेला. हेच रथीमहारथी फुटू शकतात याची झलक जिल्हा बँक अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने मविआ (पवार-थोरात) यांना दाखविली. जिल्हा बँकेतील राजकीय फुटीचे पडसाद भविष्यात जिल्ह्याच्या राजकीय पटलावर उमटतील. आगामी निवडणुकीत मविआला चारीमुंड्या चित करण्याच्या राजकीय नितीची पेरणी भाजपने या निवडणुकीत केली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. विखे-कर्डिले एकत्र आल्यास काय होते? याची प्रचिती तर आलीच मात्र गाफिलपणाचा धक्काही पवार-थोरातांना बसला, हे तितकेच खरे!
संशयाचा कटाक्ष अन् पुढचे पाऊल !
सहकारात पक्षीय राजकारण नको म्हणार्यांची बैठक अजित पवार-बाळासाहेब थोरातांनी घेतली. मात्र या बैठकीला भाजपच्या एकालाही बोलविले नाही. हीच बाब कर्डिलेंना खटकली. पवारांची बैठक आणि मविआचा राजकीय डावपेचाचा इतिवृत्तांत कर्डिलेंनीही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानी घातला. 'ते पक्षीय राजकारण करत असेल तर तुम्ही करा, अध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे', असा कानमंत्र देत फडणवीसांनी 'आदेश' दिले. पाठोपाठ मंत्री विखे पाटील यांनी जादूची कांडी फिरविली.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील-शिवाजी कर्डिले यांनी मविआतील नाराज हेरत त्यांच्यावर जाळे फेकले. मविआचे नाराज अलगद विखे-कर्डिलेंच्या जाळ्यात अडकले. तेथेच मविआचा (पवार-थोरात) घात झाला. कर्डिले हे राजकीय बाजी पलटविण्यात माहिर मानले जातात. फडणवीसांचा फोन, विखेंची जादूकी झप्पी अन् कर्डिलेंचा डाव यशस्वी झाला. आता कोण फुटले यांचा शोध घेण्यात मविआचा वेळ खर्ची पडेल, अनेकांकडे संशयाचा कटाक्ष टाकला जाईल, हीच संधी साधत विखे-कर्डिले आगामी निवडणुकांचे डावपेच टाकण्यासोबतच पुढचे पाऊल टाकेल, यात शंका नाही.