नगर : पावसाने 350 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

नगर : पावसाने 350 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
Published on
Updated on

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी तालुक्यात सर्वदूर झालेल्या वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले. सुमारे 350 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाकडून समजली आहे. अचानकपणे पडलेल्या पावसामुळे गहू पिकाने माना टाकून दिल्या. तर शेतामध्ये साठवणूक केलेल्या कांद्याचेही मोठे नुकसान झाले. जिल्ह्याला वादळी वार्‍यासह विजेच्या कडकडाट करीत धो- धो कोसळलेल्या अवकाळी पावसाने राहुरीतही थैमान घातले. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, म्हैसगाव, टाकळीमिया, देवळाली प्रवरा, वांबोरी, ब्राम्हणी, गुहा, सोनगाव, सात्रळ, तांभेरे, निंभेरे, कानडगाव, कोल्हार खुर्द, कनगर, पाथरे, मल्हारवाडी, घोरपडवाडी, खडांबे, बाभूळगाव, वरवंडी, मानोरी, वळण, आरडगाव, देसवंडी, कोंढवड, तांदूळवाडी आदी सर्वच पट्ट्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला.

रविवारी रात्रीच्या वेळी सोसाट्याचे वारे वाहत होते. त्यानंतर विजांचा कडकडाट सुरू झाला. रात्री अचानकपणे जोरदार पाऊस सुरू झाला. तासभर सुरू असलेल्या पावसामुळे म्हैसगाव, ब्राम्हणी, देवळाली प्रवरा, टाकळीमिया आदी पटट्यामध्ये रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. तर गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर सलग दुसर्‍या दिवशी (सोमवारी) पुन्हा रात्रीच्या वेळी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे जोरदार वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. रस्त्यावरील छोटी- मोठी झाडे उन्मळून पडली होती. विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण विभागाला तारेवरची कसरत करावी लागली.

याबाबत कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राहुरी तालुक्यात सर्वाधिक गहू पिकाला फटका बसल्याची प्राथमिक माहिती दिली. राहुरी हद्दीत सुमारे 12 हजार हेक्टर क्षेत्रावर गहू पीक उभा होता. बहुतेक शेतकर्‍यांनी गव्हाची काढणी केली. तर उभ्या क्षेत्रापैकी सुमारे 250 ते 300 हेक्टर गहू पिकाला अवकाळीचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासह शेतामध्ये काढणी झालेल्या कांद्याचे नुकसान झाले असल्याचे सांगितले आहे. उर्वरित ऊस, फळबागा, मका, हरबरा यांचे कमी नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्यभरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. याबाबत राहुरी प्रशासनाकडून नुकसानीची माहिती घेत अहवाल सादर करण्याचे काम सुरू असल्याचे समजले आहे. राहुरी परिसरात शेतकर्‍यांची 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अवकाळी पावसाने अचानकपणे धो धो कोसळत शेती पीकांवर पाणी फेरल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. मागिल दोन वर्षांपासून अतिवृष्टी, गारा, ढगफुटीमुळे शेतकर्‍यांचे रब्बी व खरीप पीकांना फटका बसतच आहे. एकीकडे शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसताना दुसरीकडे निसर्गाकडून प्रकोप सुरू आहे. परिणामी शेतकरी चिंतातूर झाला आहे. तोट्यात सापडलेल्या शेतकर्‍याच्या माथी कर्जाचे डोंगर वाढतच आहे.

अहवाल सादर करीत पंचनाम्याचे आदेश
कृषी विभागाकडून सुमारे 350 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची प्राथमिक
माहिती मिळाली आहे. गहू, कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे समजले आहे. जिवितहानी कोठेही झाली नाही. लवकरच पंचनाम्यासाठी आदेश देणार असल्याचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी सांगितले.

अतिवृष्टीच्या निधीपासून वंचितच
राहुरी प्रशासनाकडून माहे जुलै ते ऑक्टोबर 2022 या काळात अतिवृष्टीने
48 हजार 341 शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. शासनाकडून सुमारे 84 कोटी रुपये नुकसान झाल्याचा अहवाल सादर केलेला आहे. परंतु ते अनुदान मिळण्यासाठी तारीख पे तारीख दिली जात आहे. शासनाने आता शेतकर्‍यांची थट्टा न करता अतिवृष्टी निधी तातडीने बँक खात्यात जमा करण्याची विनवणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news