नगर : पंधरा दिवसांपासून ‘जात पडताळणी’ ठप्प! ‘बार्टी’ची वेबसाईट बंद | पुढारी

नगर : पंधरा दिवसांपासून ‘जात पडताळणी’ ठप्प! ‘बार्टी’ची वेबसाईट बंद

नगर; पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या विविध कामकाजासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक आहे. मात्र, संबंधित कार्यालयाची बार्टीची अधिकृत वेबसाईट गेल्या 15दिवसांपासून बंद असल्याने सर्वच कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे असंख्य विद्यार्थी, नोकरदार आणि राजकीय पदाधिकार्‍यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, सध्या अधिवेशन सुरू आहे. राज्यपातळीवरच ऑनलाईन जात पडताळणी ठप्प असल्याने याचे पडसाद विधिमंडळातही उमटण्याची शक्यता आहे.

शासनाच्या धोरणांनुसार जात प्रमाणपत्र पडताळणी बंधनकारक आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना, व्यवसायिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना, शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करणार्‍या विद्यार्थ्यांना अशी पडताळणी गरजेची आहे. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राखीव जागांवरून जे सदस्य निवडून आले आहेत. त्यांनाही विहित वेळेत पडताळणी निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे. शासकीय, निमशासकीय सेवेतील कर्मचार्‍यांना ही पडताळणी आवश्यक आहे. त्यामुळे ही पडताळणी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले जातात.

दररोज 150 ऑनलाईन अर्ज !
नगरच्या जात पडताळणी कार्यालयाकडे ‘बार्टी व्हॅलेडीटी महाराष्ट्र गर्व्हमेंट डॉट ईन’ या वेबसाईटवर दररोज 150 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त होत असतात, मात्र, 10 दिवसांपासून ही साईट बंद असल्याने कामकाज ठप्प झाल्याची माहिती नगरच्या संबंधित विभागाचे गटकळ यांनी दिली.

साईड ओपनच होत नाही!
जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी बार्टीच्या संबंधित अधिकृत वेबसाईट ओपन केल्यास त्यावर कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अनेकदा प्रयत्न करूनही ही साईट कार्यान्वित होत नसल्याने नगरच्या जात प्रमाणपत्र कार्यालयाकडे संपर्क केला, मात्र, त्या ठिकाणाहून अपेक्षेप्रमाणे उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, नगरसह संपूर्ण राज्यातच अशाप्रकारे साईट बंद असल्याने जातप्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन कामकाज थांबलले आहे. त्याचा विद्यार्थी, पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. असे असताना ही तांत्रिक अडचण नेमकी का आली, ती कधी दूर होईल, याविषयी नगरच्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या एकाही अधिकारी व कर्मचार्‍याला माहिती नसल्याचेही आश्चर्य आहे.

हेलपाट्यांमुळे संताप!
विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांत जात प्रमाणपत्र पडताळणी आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून जात पडताळणी प्रस्ताव किंवा ज्यांचे प्रस्ताव पुर्वीच वैध ठरले आहेत, अशांचे प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने घेणेदेणे ही सर्वच प्रक्रिया ठप्प आहे. एकीकडे सर्व प्रक्रिया ऑनलाईन सक्तीची करायची आणि दुसरीकडे सदर वेबसाईट दिवसेंदिवस बंद ठेवायची, हे योग्य नाही.
या गोंधळामुळे मी आठ दिवसांपासून नगरचे हेलपाटे मारत आहे, अशी भावना एका पालकाने दै. पुढारीकडे व्यक्त केली.

नगरमध्येच नाही, तर राज्यभरातच गेल्या आठ दिवसांपासून संबंधित ऑनलाईन साईट बंद आहे. याबाबत आम्ही पाठपुरावा केलेला आहे. एक-दोन दिवसांत ऑनलाईन प्रक्रिया सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे.

                                    – ए. शेख, उपायुक्त, जातप्रमाणपत्र विभाग

 

Back to top button