मढी यात्रेला आजपासून प्रारंभ; गोपाळ समाजाच्या होळीसाठी मोठा बंदोबस्त

मढी यात्रेला आजपासून प्रारंभ; गोपाळ समाजाच्या होळीसाठी मोठा बंदोबस्त

Published on

मढी; पुढारी वृत्तसेवा : मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेस आजपासून (दि.6) सुरुवात होत आहे. सकाळी 9 वाजता कैकाडी समाजाची मानाची काठी मंदिराच्या कळसाला भेटवून, तर सायंकाळी गोपाळ समाजाची होळी पेटविल्यानंतर यात्रेस प्रांरभ होणार आहे. गोपाळ समाजाच्या दोन गटाचा होणारा वाद लक्षात घेता होळी पेटविण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त राहणार आहे.

मढी यात्रेस आज प्रारंभ होणार असून, 12 मार्चला रंगपंचमी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. होळी ते गुढीपाडव्यापर्यंत मढीची यात्रा भरते. दोन वर्षे कोरोना महामारीमुळे यात्रा भरली नाही. मागील वर्षी निर्बंधांमुळे यात्रा कमी प्रमाणात भरली होती. यंदा मात्र यात्रेस मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे. पंधरा दिवस चालणार्‍या यात्रेसाठी विविध राज्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात. यात्रेनिमीत्त पुणे, नगर, पाथर्डी, करंजी, तिसगाव, शेवगाव, सोलापूर, पंढरपूर, औरंगाबाद येथून हॉटेल व्यावसायिक दाखल झाले आहेत. रहाटपाळणे, मनोरंजनाची साधने, प्रसाद, खेळणीची दुकाने थाटण्यासही सुरुवात झाली आहे.

यात्रेची सर्व तयारी देवस्थान समिती व ग्रामपंचायतीकडून सुरू आहे. भक्तांना सुलभपणे दर्शन घेता यावे, यासाठी दर्शन बारीत बॅरिकेटींग व मजबूत रेलिंग अशी कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. कानिफनाथ मंदिर व परिसरात सुशोभिकरण मंदिराला विद्युत रोषणाई काम पूर्ण झाले आहे. विद्युत व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था तसेच मंदिरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठीच्या कामांनी वेग घेतला आहे.

मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड, सचिव विमलताई मरकड, सरपंच संजय मरकड, उपसरपंच रवींद्र आरोळे, ग्रामसेवक विठ्ठल राजळे, ग्रामपंचायत सदस्य देवस्थान समिती सर्व विश्वस्त, ग्रामपंचायत सदस्य, यांसह सर्वच कर्मचारी विश्वस्त व परिश्रम घेत आहेत. 18 ते 21 मार्च दरम्यान कानिफनाथ समाधी मंदिर दर्शनाला खुले राहणार असून, भाविकांना थेट प्रवेश मिळणार आहे.

होळी पेटविण्यासाठी पोलिसांनी पत्र
यावर्षी ज्या पाच मानकर्‍यांना होळी पेटवायची आहे, त्यातील दोन मानकर्‍यांनी होळी आमचे वारसदार पेटवतील, असे पत्र मढी देवस्थान समितीला दिले आहे. देवस्थानने या पत्राची माहिती महसूल व पोलिस प्रशासनाला दिली असली तरीही एका गटाने होळी पेटवण्याचे मान न्यायालयाने ज्या मानकर्‍यांना दिला त्यांनी होळी पेटवावी, मानकर्‍यांनी आपले उत्तराधिकारी कोण आहे, असे परस्पर ठरवू नये, अशी भूमिका घेतली असल्याने होळी पेटवताना वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला.

सुसज्ज दर्शन बारीची व्यवस्था
देवस्थान समितीकडून भाविकांना सुलभ दर्शनासाठी सुसज्ज दर्शन बारीची व्यवस्था केली आहे. दर्शन बारीचे रुंदीकरण केल्याने कमी वेळेत समाधीचे दर्शन होईल. संपूर्ण गडाला लोखंडी पाईपचे संरक्षण कठडे बसविले आहेत. मंदिर परिसर व आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचे अध्यक्ष बबन मरकड यांनी सांगितले.

यावर्षीही पशुहत्या नाही
मढी येथे चैतन्य कानिफनाथांंची संजीवन समाधी असलेले पवित्र क्षेत्र आहे. नाथपंथाला कधीही पशुहत्या मान्य नव्हती. यावर्षीही ग्रामपंचायतीने पशुहत्या बंदी कायम ठेवली आहे. जनजागृती करून पशुहत्या करू दिली जाणार नाही, असे सरपंच संजय मरकड यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news