नगर : 822 गावांचा कारभार पोलिस पाटलांविना | पुढारी

नगर : 822 गावांचा कारभार पोलिस पाटलांविना

दीपक ओहोळ

नगर : गेल्या दहा-बारा वर्षांपासून पोलिस पाटील भरती रखडली आहे. त्यामुळे पोलिस पाटीलपदाच्या रिक्त संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज मितीस जिल्ह्यातील 822 पोलिस पाटलांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास पोलिस प्रशासनास अडचणी येत आहेत. राज्य शासनाने पोलिस पाटील पदाच्या रिक्त जागा भरण्यास हिरवा कंदील दिला. त्यामुळे उपविभागीय कार्यालयामार्फत आता बिंदुनामावलीसाठी धावपळ सुरू आहे.

एकेकाळी पोलिस पाटील हे गावातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्त्व. आर्थिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या मोठी असामी. त्यामुळे पोलिस पाटील हे पद देखील वारसाहक्काने मिळत होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तीन साडेतीन दशकं पोलिस पाटलांचा रुबाब कायम होता. त्यानंतर पोलिस पाटीलपदी मागासवर्गीय व्यक्तींची शासनाकडून नियुक्ती केली जाऊ लागली. गावगाडा चालविण्यास पोलिस पाटलांना दरमहा मानधन मिळू लागले. गेल्या दीड दशकांपासून पोलिस पाटीलपदी महिला देखील विराजमान झालेल्या आहेत.

दहा वर्षांपूर्वी रिक्त जागा भरण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी भरती प्रक्रिया हाती घेतली. संगमनेर व श्रीरामपूर प्रांत कार्यालयाने पोलिस पाटील भरती प्रक्रिया पूर्ण केली. उर्वरित ठिकाणी मात्र, शासनाने दुष्काळी परिस्थितीमुळे प्रक्रिया थाबविण्याचे आदेश दिले. दुष्काळ, निवडणुका व इतर विविध कारणांमुळे राज्य शासनाकडून भरती प्रक्रियेला वारंवार स्थगिती दिली गेली. मध्यंतरी वर्षापूर्वी भरती पक्रियेस प्रारंभ झाला होता. मात्र, आरक्षणामुळे भरती थांबली होती.

जिल्ह्यासाठी पोलिस पाटलांची 1 हजार 443 गावांसाठी पोलिस पाटलांची पदे मंजूर आहेत. निधन, वय व इतर कारणामुळे पोलिस पाटलांची पदे रिक्त होत आहेत. आजमितीस 822 पदे रिक्त आहेत. एकूण मंजूर पदांच्या तुलनेत 56 गावांचा कारभार पोलिस पाटलांविना सुरू आहे. पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक 109 पदे रिक्त आहेत. पारनेर तालुक्यात देखील 108, नगर तालुक्यात 83 पदे रिक्त आहेत. काही दिवसांपूर्वीच पोलिस पाटलांची रिक्त पदे भरण्यास शासनाने अनुमती दिली. त्यामुळे गावागावांत पोलिस पाटील उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पोलिस पाटलाचे काम पोलिस ठाण्यासंबधी असते. मात्र, त्याची नियुक्ती उपविभागीय अधिकारी तथा प्रातांधिकारी यांच्याकडून होते. शासनाच्या आदेशामुळे संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, नगर, पाथर्डी, कर्जत व श्रीगोंदा-पारनेर या सात उपविभागीय अधिकारी कार्यालयांत पोलिस पाटील भरतीची लगबग सुरू झाली आहे.

काही उपविभागीय अधिकारी कार्यालयाने पोलिस पाटील पदासाठी बिंदुनामावलीस मंजुरी घेतली आहे. काहींनी त्यासाठी प्रस्ताव तयार केले आहेत. विभागीय आयुक्त यांच्याकडून बिंदुनामवलीस मान्यता मिळाल्यानंतर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडून गावनिहाय लोकसंख्येची माहिती मागवली जात आहे. आरक्षण प्रक्रियेनंतर परीक्षाव्दारे नियुक्त्या होतील.

पोलिस पाटलांअभावी कामे ठप्प .
पोलिस पाटील गावपातळीवरील कायदा सुव्यवस्था राखण्यास पोलिसांना मदत करीत आहे. गावातील सण, उत्सव व यात्रा यावर लक्ष ठेवण्याचे काम करावे लागत आहे. अत्यंत गंभीर व इतर गुन्ह्यातील आरोपींची गुप्त माहिती पोलिसांना पुरविणे तसेच गावातील आरोपी शोधून त्यालापकडून देण्यास पोलिसांना सहकार्य करणे आदी विविध कामे पोलिस पाटलांना करावी लागत आहेत. महसूल-पोलिस प्रशासन व गावकर्‍यांचा दुवा म्हणून पोलिस पाटलाला कामगिरी करावी लागत आहे. पोलिस पाटलांच्या रिक्त जागाअभावी 822 गावांतील ही कामे ठप्प झाली आहेत.

Back to top button