नगर : शिंदे- फडणवीस सरकारचे शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष : आ.थोरात

नगर : शिंदे- फडणवीस सरकारचे शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष : आ.थोरात
Published on
Updated on

संगमनेर/संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारमध्ये शेतकर्‍यांचे प्रतिनिधित्व नेमके कोण करणारा आणि त्यांचे दुःख जाणून कोण घेणारा, अशी परिस्थिती या सरकारची आहे. या सरकारमधील नेते भाषण खूप सुंदर करतात, परंतु नुसती भाषणे करून पोट भरत नाही. त्यासाठी सरकारने शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडेसुद्धा लक्ष दिले पाहिजे, मात्र हे सरकार शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका काँग्रेस विधीमंडळ पक्ष नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

महावितरणकडून वीजबिल वसुलीच्या नावाखाली कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे कांद्याला हमीभाव मिळावा आणि तोडलेले वीज कनेक्शन पुन्हा तत्काळ जोडण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठनेते, माजी महसूलमंत्री आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली रस्तारोको न करता काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र बसस्थानकाजवळ तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. शेतीला 12 तास वीज मिळालीच पाहिजे. नाफेडमार्फत कांदा खरेदी केलाच पाहिजे. बंद करा, बंद करा वीज कनेक्शन तोडणी बंद करा. शेतकर्‍यांच्या पिकांना हमी भाव मिळालाच पाहिजे. आ. बाळासाहेब थोरात यांचा विजय असो, शिंदे सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी बस स्थानक परिसर दणाणून सोडला.

आ. थोरात बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील कांदा, कापूस व भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा कठीण प्रसंगात सरकारने शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, मात्र सरकार मात्र मेट्रो अन् स्मार्ट सिटीकडेच जास्त लक्ष देत असल्याची टीका आ. थोरात यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारने कायम शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कम उभे राहून त्यांना मदत केली, मात्र सध्याचे शिंदे- फडणवीस सरकारचे शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगत हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका आ. थोरात यांनी केली. यावेळी माजी आ. डॉ. सुधीर तांबे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, मात्र केंद्रातील मोदी आणि राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार उद्योजकांना पाठीशी घालून शेतकर्‍यांना मात्र वार्‍यावर सोडून देत त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत असल्याची खरमरीत टीका डॉ. तांबे यांनी केली.

यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब थोरात, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधव कानवडे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष प्रतापराव ओहोळ, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, नवनाथ आरगडे, विष्णू राहटळ आदी आंदोलनकर्त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे व नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांना निवेदन दिले. पो. नि. भगवान मथुरे यांनी बंदोबस्त ठेवला.

जनता तुमची जिरविणार आहे : थोरात
अ. नगर जिल्ह्यामध्ये सध्या काही लोकांकडून याची आडवा आणि त्याची जिरवा, असे जिरवा- जिरवीचे राजकारण सुरू आहे, मात्र अधिकार्‍यांनी विनाकारण कोणालाही त्रास देऊ नये. संगमनेर तालुक्यातील जनतेशी अधिकार्‍यांनी न्याय भूमिकेने वागावे, असे आवाहन करीत जिरवा- जिरवीचे राजकारण करणार्‍यांची जनता नक्की जिराविल्याशिवाय राहणार नाही, असा टोला काँग्रेसचे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे नाव न घेता लगावला.

लोकशाही पद्धतीचा राज्यास अनुकरणीय पॅटर्न !
रास्ता रोको शेतकर्‍यांच्या विविध न्याय मागण्यासाठी आहे, मात्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्वसामान्य जनतेला त्रास नको म्हणून आ. बाळासाहेब थोरात यांनी रास्ता रोको करण्याऐवजी धरणे आंदोलन करून आपल्या भूमिका मांडाव्या, अशी सूचना कार्यकर्त्यांना दिल्याने लोकांना वेठीस न धरता लोकशाही व न्याय पद्धतीने मागण्याचा हा पॅटर्न नक्कीच राज्यासाठी अनुकरणीय ठरणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news