

करंजी : पुढारी वृत्तसेवा : शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही धूमस्टाईलने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबडून नेण्याचे प्रकार दिवसा-ढवळ्या होऊ लागले असून, रात्रीच्या वेळी शेतकर्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी, सौर ऊर्जेचे साहित्य, मोटारसायकली अशा अनेक चोर्या सातत्याने होत आहेत. राजरोसपणे चालणारे अवैध धंदे, रात्री-अपरात्री उघडे असणारे धाबे, यामुळे पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील गावात दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत.
पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील करंजीसह भोसे, खांडगाव, लोहसर, जोहारवाडी, राघुहिवरे, मोहोज, तिसगाव, निवडुंंगेसह अनेक गावात खुलेआम मटका, जुगार, अवैध दारू विक्री होत आहे. चोर्या, हाणामार्या, गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही दिवसांपूर्वी निंबोडी फाट्यानजिक भरदिवसा सराफास अडवून लुटले. परिसरातील शेतकर्यांच्या विहिरीवरील अनेक इलेक्ट्रिक मोटारी चोरीस गेल्या. सौर ऊर्जेच्या प्लेटाही चोरीस जात आहेत.
नगर-पाथर्डी हायवेचे काम करणार्या ठेकेदाराचे पाच लाखाहून अधिक रकमेचे साहित्य चोरीस गेले. करंजी उत्तरेश्वर मंदिरातील पिंडीवरील तांब्याची कळशी भरदुपारी चोरीला गेली. करंजी-मिरी आठवडा बाजारातून मोटार सायकली तसेच महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, मोबाईल चोरीस जाण्याच्या घटना घडल्या आहेत. या गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने नागरिक पोलिसांत तक्रारी देणे टाळत आहेत.
करंजी औटपोस्टला कायमस्वरुपी पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाढत्या चोर्या, अवैद्य धंद्यांना आठ दिवसात आळा न घातल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष सुभाष अकोलकर, जोहारवाडीचे चेअरमन मच्छिंद्र सावंत, घाटसिरसचे माजी उपसरपंच नवनाथ पाठक, भोसेचे सरपंच विलास टेमकर, अशोक टेमकर, हिंमत पडोळे, पंढरीनाथ चोथे, अनिल पाठक, सतीश क्षेत्रे, लालासाहेब सावंत, संतोष चव्हाण, नानासाहेब वांढेकर, बंडू सावंत यांच्यासह शेतकर्यांनी दिला आहे.