नगर : टाकळीभान येथे बिबट्याचा धुमाकूळ | पुढारी

नगर : टाकळीभान येथे बिबट्याचा धुमाकूळ

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. काल रात्री बिबट्याने दोन वेगळ्या भागात दोन कुत्र्यांवर हल्ला केल्याने दोन्ही कुत्रे जबर जखमी झाले आहे. टाकळीभान येथील वाडगाव रस्त्यालगत रहात असलेल्या आप्पासाहेब हरीभाऊ कोकणे यांचे वस्तीत रात्री 3 वाजेच्या दरम्यान बिबट्याने प्रवेश करून घरासमोर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याने कुत्रा जबर जखमी झाला आहे. दुसरी घटना पेट्रोल पंपाजवळ असलेल्या खोकर रस्ता परिसरात रहात असलेले भगवान परदेशी यांच्या वस्तीत रात्री 12 च्या दरम्यान बिबट्याने प्रवेश करून परदेशी यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला.

कुत्रा ओरडल्याने कोकणे कुटुंब जागे झाले व त्यांनी बॅटरीच्या प्रकाशात पाहिले असता बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याचे दिसून आला. बिबट्या कुत्र्याला ओढीत नेत असल्याचे दिसल्यावर कोकणे यांनी आरडा- ओरड केला. त्यामुळे बिबट्या पसार झाला. भोकर सब स्टेशन अंतर्गत कमालपूर फिडरमधून रात्रीचे भारनियमन सुरू आहे. त्यामुळे वाडगाव रस्ता परिसरात रात्री सर्वत्र अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे अंधारात बिबट्या बिनधास्तपणे फिरत असून शिकार करीत आहे. रात्री वीज असती तर विजेच्या दिव्यांमुळे बिबट्या वस्तीत आला नसता, असे आप्पासाहेब कोकणे यांनी सांगितले. या परिसरातील रात्रीचे भारनियमन बंद करावे अशी मागणी या परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

Back to top button