नगर : कांदा पीक यंदा शेतकर्‍यांचे काढणार दिवाळे ; तीन महिने भाव वाढण्याची आशा धूसरच | पुढारी

नगर : कांदा पीक यंदा शेतकर्‍यांचे काढणार दिवाळे ; तीन महिने भाव वाढण्याची आशा धूसरच

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : देशांतर्गत कांद्याच्या उत्पादनात वाढ आणि सप्टेंबरऐवजी जुलैतच होणारी काढणी, यामुळे घसरलेले कांद्याचे दर आणखी तीन महिने तरी खालच्याच पातळीवर राहण्याची चिन्हे आहेत. सध्या सरासरीपेक्षा 40 टक्क्यांनी भाव पडल्यामुळे शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च निघणेही अवघड बनले आहे. मार्च-एप्रिलमध्ये रब्बीची आवक वाढल्यावर तर कांद्याचे दर निचांकी स्थिती गाठण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकरी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. राहुरीमध्ये नुकतेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रस्त्यावर कांदा ओतून शासनाचा निषेध केला होता. तसेच कांद्याला हमीभाव देण्याची मागणीही केली होती. विधानसभेतही कांद्याच्या भावावरून मोठा गदारोळ उडाला होता. या प्रश्नी विरोधकांनी मुख्य मंत्र्यांना धारेवर धरले होते. दरम्यान, घाऊक बाजारात कांद्याचे दर कोसळले असताना दुसरीकडे किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांना अद्यापि किलोभर कांद्यासाठी 15 ते 20 रुपये मोजावे लागत आहेत.

यंदा उत्पादन वाढीसोबतच निर्यातीचे प्रमाण चांगले असून निर्यातीने 15 लाख टनाचा टप्पा ओलांडला आहे. चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत 15 लाख 19 हजार मेट्रिक टन कांदा निर्यात झाला आहे. पूर्वी केवळ महाराष्ट्रातील कांद्यावरच देशातील बाजारपेठेचे बहुतांश गणित अवलंबून असे. पण, अलीकडे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांनीही कांदा उत्पादनात लक्षणीय भर घातली आहे. त्यातच पूर्वी कांद्याची काढणी सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान व्हायची. सध्या मात्र जुलैपासून काढणीला सुरुवात होते. त्यामुळे बाजारात कांदा आवकेचा तुटवडा जाणवत नाही. परिणामी, निर्यात वाढूनही देशांतर्गत कांदा दर 400 ते 700 रुपये प्रति क्विंटलवरच स्थिरावले आहेत.

सध्या पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, आणि राजस्थानमधील कांदा बाजारात येत असल्याने दिल्ली मार्केटसह उत्तरेतील महाराष्ट्राच्या कांद्याची मागणी घटली आहे. देशात कांदा उत्पादनाचा ग्रोथ रेट 6 ते 8 टक्क्यापर्यंत राहिला तर त्याचा दरावर फारसा परिणाम दिसत नाही. परंतु हा ग्रोथ रेट वाढल्यास दरात घसरण सुरू होते. यंदा हा ग्रोथ रेट अपेक्षेपेक्षा दुपटीहून अधिक म्हणजे 19 टक्क्यांवर जाऊन पोहोचण्याची चिन्हे असल्याने येत्या दोन-तीन महिन्यांत कांदा भाव वाढण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे कांदा अभ्यासकांनी सांगितले.

सरकारने तत्काळ हस्तक्षेप करणे गरजेचे
सध्या कांद्याचे दर पडल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संतप्त झाले आहेत. कांद्याला सध्या जो भाव मिळतोय, त्यातून अनेक शेतकर्‍यांचा वाहतुकीचा खर्चही निघत नाही. शेतकर्‍यांना उत्पादनखर्चाच्या तुलनेत सरासरी 50 टक्के तोटा होत आहे. बाजारात कांद्याचा प्रचंड पुरवठा आहे. निर्यात आणि देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी लागणार्‍या कांद्यापेक्षा पुरवठा जास्त असल्यामुळे भाव कोसळले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप केला नाही तर पुढील दोन आठवडे बाजारातील ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

*कोपरगाव ः 300-840 *राहुरी (वांबोरी) ः 100-1000
* संगमनेर ः 500-1025 *राहाता ः 150-800

Back to top button