नगर : प्रभागरचनेचे प्रस्ताव आयुक्तांच्या दारी ; 17 एप्रिल रोजी प्रारूप मसुदा होणार प्रसिद्ध | पुढारी

नगर : प्रभागरचनेचे प्रस्ताव आयुक्तांच्या दारी ; 17 एप्रिल रोजी प्रारूप मसुदा होणार प्रसिद्ध

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी आतापासूनच सुरु झाली. शासनाच्या आदेशानुसार प्रभागरचनेचे काम सुरु झाले. 704 प्रभागरचनेचा प्रस्ताव गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. शुक्रवारी विभागीय आयुक्त यांची मंजुरी मिळाल्यानंतर 17 मार्च रोजी प्रारुप प्रभागरचना प्रसिध्द होणार आहे. यंदाच्या वर्षात आश्वी बुद्रूक व खुर्द, वडगाव गुप्ता, उंदीरगाव, उक्कलगाव यासह 195 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यात तब्बल 67 ग्रामपंचायतींचा कालावधी संपला आहे.

त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आलेला आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने 195 ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रभागरचना तयार केली आहे. प्रभागरचनेचा प्रस्ताव तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला आहे. विभागीय आयुक्त यांनी तपासणी केल्याशिवाय प्रारुप प्रभागरचना प्रसिद्ध करता येणार नाही. त्यामुळे प्रभागरचनेचे 704 प्रस्ताव शुक्रवारी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठविला जाणार आहे.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या मान्यतेनंतर प्रारुप प्रभागरचना 17 मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 24 मार्चपर्यंत हरकती मागविण्यात येणार आहेत. या हरकतींवर उपविभागीय अधिकारी सुनावणी घेणार आहेत. 6 एप्रिलपर्यंत सुनावणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेतल्यानंतर जिल्हाधिकारी 25 एप्रिल रोजी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करणार आहेत.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
अकोले 28, संगमनेर 7, कोपरगाव 17, राहाता 12, श्रीरामपूर 17, राहुरी 22, नेवासा 16, शेवगाव 27, पाथर्डी 15, जामखेड 3, कर्जत 6, श्रीगोंदा 10, पारनेर 7, नगर 8.

Back to top button