नगर : कृषी अभियंत्याने पंतप्रधानांना लिहिले चक्क रक्ताने माखलेले पत्र | पुढारी

नगर : कृषी अभियंत्याने पंतप्रधानांना लिहिले चक्क रक्ताने माखलेले पत्र

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये गेल्या 35 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करणार्‍या कृषी अभियंता विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. नैराश्याने कृषी अभियंता विद्यार्थी व विद्यार्थीनींनी आपल्या रक्ताने लिहीलेले पत्र राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठविले आहे. आमच्या जीवाची पर्वा राखत न्याय द्या, अशी आर्त विनवणी कृषी अभियंत्यांनी केली आहे.

गत 35 दिवसांपासून राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील अभियंता विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. राज्यभर कृषी अभियंता विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वणवा पेटला असताना राज्य शासनासह लोकसेवा आयोगाकडून आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. राज्य लोकसेवा आयोगाने परिक्षा अभ्यासक्रमात बदल करून कृषी विद्यार्थ्यांना झटका दिला आहे. न्याय मिळावा म्हणून शेकडो विद्यार्थी व विद्यार्थीनींनी अभ्यास बंद करून शासनाकडे न्याय देण्याची मागणी केली आहे. 35 दिवसामध्ये शेकडो विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. अनेकांना त्रास झाला. परंतु राज्य लोकसेवा आयोगासह राज्यकर्ते विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या रक्ताचा शाईप्रमाणे वापर करीत पत्र तयार केले आहे.

Back to top button