नगर : विरोधकांचे बेताल आरोप : खा. सुजय विखे | पुढारी

नगर : विरोधकांचे बेताल आरोप : खा. सुजय विखे

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मागील तीन वर्षांच्या कालावधीमध्ये राज्यमंत्री असतानाही राहुरी मतदार संघात एक पैशाचा नविन निधी मिळवून न देणार्‍यांनी आमच्या विकास कामांवर बोलूच नये. महाविकास आघाडी शासन काळात शेतकर्‍यांचे कोणते प्रश्न सोडविले, असा सवाल करीत खा. डॉ. सुजय विखे यांनी आ. प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता टोला लगावला. राहुरी तालुक्यातील मौजे बाभूळगाव येथे 43.66 कोटी रूपयांच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळ पाणी पुरवठा व विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी आ. शिवाजीराव कर्डिले, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटिल प्रमुख उपस्थित होते. खा. डॉ. विखे म्हणाले, न भूतो न भविष्यती असे काम मागील चार महिन्यांत आपण करून दाखविले.

हे केलेले काम आता सर्वसामान्य जनतेतून दिसत असून, जनतेला सरकारबद्दल विश्वास वाटत आहे. नेमकं हीच बाब विरोधकांची पोटदुखी ठरत आहे. तीन वर्षांत विरोधकांनी आपल्या जिल्ह्याचा विकास खुंटवला. एक दमडी देखील जिल्ह्यात आणली नाही आणि दुसरीकडे केवळ चार महिन्यांत जल जीवन मिशन योजनेंतर्गत 2 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त निधी आपण आणला. जिल्हा नियोजन समितीतून शेकडो कोटी रूपयांची कामे मंजूर करून त्यांचे शुभारंभ देखील करीत आहोत. आता आपले डबल इंजिनचे सरकार आहे, असे सांगताना मागील तीन वर्षांत शेतकर्‍यांचा कळवळा विरोधकांना का आला नाही. शिंदे- फडणवीस सरकार आले की लगेच शेतकर्‍यांवर अन्याय झालेला का दिसतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नगर जिल्ह्यातील गावांतर्गत रस्ते तसेच पडून होते, मात्र या रस्त्यांसाठी तीन वर्षांत एक रूपया निधी आणला नाही, मात्र केंद्र व राज्य सरकार या दोन्हींच्या माध्यमातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व रस्त्यांच्या दुरूस्ती तसेच डांबरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात आपणास निधी मिळाल्याचे सांगत खा. विखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या निवडणुकीत आपल्या सर्वांना घरोघरी पिण्याचे स्वच्छ पाणी तेही नळाद्वारे असा ‘शब्द’ दिला होता. त्याचीच पूर्तता येत्या सहा महिन्यांत करीत आहोत. हे आपले सरकार आहे. त्यामुळे आपल्या सर्व समस्या सोडविण्यास आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. पुढील काळात देखील आपला भाग सुजलाम्- सुफलाम् करण्यासाठी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, आम्ही आपला विश्वास सार्थ ठरवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माजी आ. शिवाजीराव कर्डिले म्हणाले, माझ्या आमदारकीच्या काळात राहुरी मतदार संघाला भरीव निधी मिळाला. रस्ते, पाणी योजनांसह प्रत्येक गावात कोट्यवधी रूपयांचा निधी दिला. या मतदार संघात प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत, सत्तेत आलेले आ. तनपुरे यांनी राहुरी तालुक्यात एकही मुलभूत प्रश्न सोडविला नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी अ‍ॅड.सुभाष पाटील यांचे समयोचित भाषणे झाले.
यावेळी डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, दि राहुरी दूध संघाचे अध्यक्ष तानाजी धसाळ, दादा पा. सोनवणे, रावसाहेब तनपुरे, पं. स. माजी सदस्य सुरेश बानकर, कारखाना संचालक रविंद्र म्हसे, कृषिभूषण सुरशिंग पवार, उदयसिंह पाटील, अमोल भनगडे, राजेंद्र सप्रे, सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण तनपुरे, शामराव निमसे, प्रभाकर म्हसे, उत्तमराव म्हसे, सरपंच अर्जुन म्हसे, तांदुळवाडीचे सरपंच अमोल पेरणे, विनित धसाळ, विराज धसाळ, ग्रामपंचायत सदस्यांसह 10 गावांतील सरपंच व नागरिक उपस्थित होते.

यावेळी बाभुळगाव (43.66), वाघाचा आखाडा (1.74), तांदूळवाडी (1.99), कोंढवड (72.32) कोटी, शिलेगाव (80 लाख) रूपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. शिलेगावात सरपंच संदिप म्हसे, उपसरपंच दत्तात्रय देवरे, गोरक्षनाथ खिलारी, परसराम धनाजी कोळसे, रविंद्र म्हसे, पोपट भांड, संजय म्हसे, बाळासाहेब भांड, कडू म्हसे, अशोक रेबडे, संदिप उंडे उपस्थित होते.

Back to top button