नगर : कांद्याचा वांदा ! भावच नाही ; शेतकर्‍यांकडून कांदा रस्त्यावर | पुढारी

नगर : कांद्याचा वांदा ! भावच नाही ; शेतकर्‍यांकडून कांदा रस्त्यावर

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : कांद्याचे दर कोसळल्याने शेतकर्‍यांचा वांधा झाला. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर-मनमाड महामार्गावर कांदा रिचवित अक्षरशः ढीग टाकला.
दरम्यान, राज्यात सत्तेत आलेले शिंदे- फडणवीस शासन शेतकरीविरोधी आहे. भाजप शासनाला 2024 ला सत्तेतून निलंबित करण्याची गरज असल्याचे मोरे म्हणाले. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोरे बोलत होते. कांद्याचे भाव कोसळल्याने झालेला उत्पादन खर्च मिळणे मुश्किल झाले आहे. शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता कांद्याला प्रति क्विंटल 2500 रुपये भाव मिळावा.

विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान मिळावे. राज्य व केंद्र शासनाने शेतकर्‍यांना नामोहरम करण्यात कसर सोडली नाही. नैसर्गिक आपत्ती व शासनाच्या कृषी विरोधी धोरणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकर्‍यांची वीज पुरवठा कापणी सुरू आहे. महावितरण अधिकार्‍यांना तोंडी आदेश देत बील वसुलीचे फर्मान सोडले जात आहे. वसुली न केल्यास निलंबित करण्याचे तुघलकी फर्मान सोडणार्‍या भाजप शासनाला सर्व शेतकर्‍यांनी निलंबित करावे, असे आवाहन मोरे यांनी केले.

प्रकाश देठे म्हणाले, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्यासह संपूर्ण शेत मालाचे भाव गडगडले आहेत. अन्य देशांमध्ये कांद्याचा प्रचंड प्रमाणात तुटवडा आहे. तेथे यापेक्षा कांद्याला वाजवी दर मिळत आहे. सरकारला शेतकर्‍यांचे प्रश्न चर्चेमध्ये घ्यावेसे वाटत नाही. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकार हे मनमानी झाले आहे. शेतकरी मेला पाहिजे, अशी धारणा ठेवणारे शिंदे- फडणवीस शासनाला शेतकर्‍यांना सरणावर घेऊन जायचे आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

सरकार आज हसत असले तरी येणार्‍या निवडणुकीत बटण कोणाला दाबायचे, सरकार कोणाचे आणायचे हे शेतकरीच ठरवतील. शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेतून पाय उतार केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया देठे यांनी व्यक्त केली. आंदोलनात राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, सुरेश बाफना, दीपक तनपुरे, सचिन उंडे, संतोष आघाव, महेश उदावंत, सचिन म्हसे, किशोर वराळे, जमीर आतार, बाळासाहेब जाधव, पिंटू साळवे, अनंत वने, सतीश पवार, राहुल करपे, अशोक निमसे, सतीश निमसे, अशोक चौधरी, रविंद्र मोरे, जुगलकिशोर गोसावी, सतीश पवार, सुनील इंगळे, प्रमोद पवार, सचिन म्हसे, रोहीत बोरावके, राहुल करपे, संदीप शिरसाठ, किशोर वराळे, प्रसाद धुमाळ, अमोल पवार, प्रवीण पवार, कैलास जाधव, निलेश लांबे, विशाल तारडे, दिनेश वराळे, बाबासाहेब धुमाळ, विक्रांत धुमाळ, संदीप खुरूद, सुभाष जुंद्रे, अशोक निमसे, बाळासाहेब जाधव, प्रताप पटारेंसह शेतकरी उपस्थित होते. नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी मागणीचे निवेदन घेतले. पो. नि. मेघश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला.

Back to top button