श्रीरामपूर : अनुदानासह वीजप्रश्नी आक्रोश आंदोलन; शेतकर्‍यांची रक्कम जमा करा | पुढारी

श्रीरामपूर : अनुदानासह वीजप्रश्नी आक्रोश आंदोलन; शेतकर्‍यांची रक्कम जमा करा

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीचे अनुदान तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावे. विस्कळीत वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करीत काँग्रेस किसान सेलच्या वतीने माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस तालुकाध्यक्ष अरुण.पा. नाईक, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयासमोर शेतकर्‍यांनी आक्रोश आंदोलन केले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त व शेतकरी बांधव उपस्थित होते. आंदोलन व पोलिस बंदोबस्तामुळे तहसील कार्यालयास छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

आ. लहू कानडे यांच्या आदेशानुसार काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आलेल्या आक्रोश आंदोलनामध्ये शासनाने चालविलेल्या क्रुर चेष्टाचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी अशोक कानडे यिांनी शासनाच्या धोरणाचा जोरदार निषेध केला. शेतकर्‍यांची सहानुभूती मिळण्यासाठी सरकार अनुदानाच्या घोषणांवर घोषणा देत आहे. अ. नगर जिल्ह्यास 292 कोटी रुपये जमा केल्याची घोषणा हवेत विरली.

आजतागायत शेकर्‍यांच्या पदरात नुकसान भरपाईचा एक रुपयाही मिळाला नाही. उलट व्यापार्‍यांनी कांद्यासारख्या मालास 2 रुपयांचा चेक देऊन शेतकर्‍यांच्या जखमेवर मिट चोळण्याचे काम केल्याचे कानडे म्हटले. जोपर्यंत शेतकरी बांधवांना न्याय मिळणार नाही. नुकसानग्रस्त सर्व शेतकर्‍यांना शासनाचे नियम बाजूला ठेवून सरसकट नुकसान भरपाई दिली जात नाही, तोपर्यंत संघर्ष चालू राहील, असा इशारा कानडे यांनी दिला.

यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक म्हणाले, सध्या केंद्र व राज्य सरकार शेतकरीविरोधी आहे. केवळ देखावा करुन शेतकरी व सामान्य जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोप नाईक यांनी केला. ज्ञानेश्वर मुरकुटे म्हणाले, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे व्हावेत. विमा कंपन्यांच्या अडमुठे धोरणाविरोधात आ. लहु कानडे व अशोक कानडे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभा केला.

त्याला यश येऊन मतदार संघात नुकसानीचे सरसकट पंचनामे झाले, परंतु अजुन शेतकर्‍यांना रुपया देखील मदत शासनाने दिली नाही. शासनाने त्वरित शेतकर्‍यांना मदत करुन दिलासा द्यावा, अशी भावना मुरकुटे यांनी व्यक्त केली. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, महावितरण अभियंता चावडा व कृषी अधिकार्‍यांनी निवेदन स्वीकारले. किसान सेलचे अध्यक्ष अजिंक्य उंडे यांनी आभार मानले.

… तर रस्त्यावरची लढाई लढावी लागेल
आज विधायक व शांततेच्या मार्गाने केलेले आंदोलन यापुढे शासनाने शेतकर्‍यांच्या भावना घेतल्यास रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. गोर-गरीबांच्या कष्टावर अदानी-अंबानी यांची घरे भरणार्‍या या सरकारला भानावर आणावे लागेल. यासाठी वेळप्रसंगी उग्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा अशोक कानडे यांनी दिला.

Back to top button