श्रीगोंदा : जिल्हा बँक अध्यक्षपदी श्रीगोंद्याला संधी? माजी आ. राहुल जगताप यांच्या नावाची चर्चा | पुढारी

श्रीगोंदा : जिल्हा बँक अध्यक्षपदी श्रीगोंद्याला संधी? माजी आ. राहुल जगताप यांच्या नावाची चर्चा

अमोल गव्हाणे

श्रीगोंदा : जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचे निधन झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी माजी आमदार राहुल जगताप यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जिल्हा सहकारी बँकेवर राष्ट्रवादी व काँगेसचे वर्चस्व आहे. राज्यातील इतर काही सहकारी बँकां आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्या असताना नगर जिल्हा सहकारी बँक मात्र स्वतःचे अस्तित्व टिकवून आहे.

राष्ट्रवादीचे संचालक जास्त असल्याने अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहे. गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेले अध्यक्ष उदय शेळके यांचे निधन झाल्यानंतर आता त्या जागी नवीन अध्यक्ष नियुक्त होणार असून, अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. जिल्ह्यातील इतर मातब्बर नेत्यांसोबतच माजी आमदार जगताप यांचे नाव चर्चेत आहे. स्व. कुंडलिकराव जगताप यांनी जवळपास दहा वर्षे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले. त्यानंतर राहुल जगताप हे जिल्हा बँकेवर काम करीत आहेत.

राजकारणात पदार्पण करताच त्यांना आमदारकीची संधी मिळाली. राजकीय अनुभव नसताना त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून तालुक्यात स्वतःचा गट उभा करून तो सक्रिय केला. राजकीय कसब वापरून त्यांनी सहकारी संस्था बिनविरोध करून स्वतःच्या ताब्यात ठेवल्या. हे करत असतानाच जिल्हा बँकेत शेतकरी हिताला प्राधान्य देऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. बँक प्रशासनावर त्यांची मजबूत पकड, ही त्यांच्या जमेची बाजू आहे.

माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि राहुल जगताप या दोन नावांची सध्या चर्चा सुरू आहे. घुले यांना बँकेत काम करण्याचा अनुभव असला तरी अध्यक्षपदाची संधी देताना राजकीय गणितांचा विचार करावा लागणार आहे. चंद्रशेखर घुले यांच्या पत्नी राजश्री घुले यांना जिल्हा परिषदेत पाच वर्षे उपाध्यक्ष व अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद देताना या बाबींचा विचार करावा लागणार आहे.

नगर दक्षिणेला विशेषतःः श्रीगोंदा तालुक्याला आतापर्यत अध्यक्षपदाची संधी मिळाली नाही. जगताप यांच्या रूपाने अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास 2024 च्या विधानसभा, लोकसभा निवडणुकांत त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. अन राष्ट्रवादीने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यावर अनुकूल असले, तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीची बडी मंडळी कसा पवित्रा घेतात, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Back to top button