नगर : प्राध्यापक होले खुनातील आरोपी पोलिसांना सापडेना | पुढारी

नगर : प्राध्यापक होले खुनातील आरोपी पोलिसांना सापडेना

नगर; पुढारी वृत्तसेवा : प्राध्यापक होले यांच्यावर झालेल्या शूटआऊटला पाच दिवसाचा कालावधी उलटला. मात्र, खुनातील हल्लेखोर अद्यापि मोकाट आहेत. हल्लेखोरांचे धागेदोरे मिळत नसल्याने ’खाकी’च्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. होलेंच्या खुनाच्या तपासाला गती मिळत नसल्याने समता परिषद या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी व नेप्ती येथील ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षकांकडे सोमवारी (दि.27) धाव घेतली होती.

प्रा.शिवाजी किसन ऊर्फ देवा होले (रा.जाधव पेट्रोल पंपाजवळ, कल्याण रोड, नगर) यांची गुरुवारी (दि.23) गावठी कट्ट्यातून गोळी झाडून हत्या करण्यात आली. होले यांचे मित्र व नातेवाईक अरुण नाथा शिंदे (रा.नेप्ती, ता.नगर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी खुनाचा व लूटीचा गुन्हा दाखल केला. प्रा.होले हे त्यांचे मित्र शिंदे यांच्यासमवेत हॉटेल के-9 जवळ अंधारात मद्यपान करीत असताना लूटारूंनी पैशांसाठी गोळी झाडून खून केल्याची फिर्याद दाखल आहे. मात्र, या घटनेबाबत अनेक वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

खुनाला पाच दिवस झाले मात्र, पोलिसांचा तपास तिथेच थांबला आहे. तपासाला दिशा मिळत नसल्याने तो पुढे सरकत नसल्याचे चित्र सध्यातरी आहे. त्याचाच निषेध म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व नेप्ती ग्रामस्थांनी सोमवारी एसपींकडे धाव घेतली होती. होलेंचा खून लूटीच्या कारणातून की इतर दुसर्‍या कोणत्या कारणातून, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

केडगाव बायपास रस्त्यावरील हॉटेल्स व इतर ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजचाही आधार पोलिस घेत आहेत. सोबतच स्थानिक गुन्हे शाखेसह कोतवाली, नगर तालुका पोलिसांची चार पथके गुन्ह्याच्या तपासात कार्यरत असल्याचे सांगितले जात असले तरी पोलिसांना अद्यापि हातात काहीच लागले नसल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आंदोलनातचा इशारा
होले यांच्या दहाव्या पर्यंत मारेकर्‍यांचा शोध न लागल्यास ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अंबादास गारुडकर, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, महानगर अध्यक्ष दत्ताभाऊ जाधव, तालुका अध्यक्ष रामदास फुले, शाखा अध्यक्ष शाहुराजे होले, नेप्तीचे उपसरपंच संजय जपकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, राष्ट्रवादीचे प्रा. माणिक विधाते, भाजपचे अभय आगरकर, सुवेंद्र गांधी, शिवसेनेचे संभाजी कदम, दिलीप सातपुते, संदेश कार्ले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

होलेंचा मोबाईल एलसीबीकडे?
खुनानंतर होले यांचा मोबाईल हल्लेखोरांनी घेऊन गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. परंतु, प्रा.होलेंचा मोबाईल एलसीबीच्या हाती लागला असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. त्यातूनही काही माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, याला एलसीबीचे प्रमुख अनिल कटके यांनी दुजोरा दिला नाही.

घटनेला लुटीचा रंग?
होलेंचा खून लुटीच्या इराद्याने झाला असल्याचे प्रथम दर्शनी चित्र असले तरी त्याला इतरही कंगोरे असल्याची चर्चा दबक्या आवाजात पहिल्या दिवसापासून आहे. कारण, खून म्हटले तर होलेंच्या बोटातील सोन्याची अंगठी, जवळील पाकीट व मनगटी घड्याळ घेऊन न जाताच हल्लेखोर पळून गेले. तसेच, होलेंच्या मद्यपानावर कुटुंबियांना विश्वास बसत नसल्याचीही माहिती आहे.

Back to top button