अकोले : शुभमंगल; तरुणांनो आता सावधान! बनावट लग्न लावणारी टोळी सक्रिय | पुढारी

अकोले : शुभमंगल; तरुणांनो आता सावधान! बनावट लग्न लावणारी टोळी सक्रिय

अकोले; पुढारी वृत्तसेवा : सध्या अनेक तरुणांना लग्नाची रेशीम गाठ बांधण्यासाठी जीवनसाथी शोधताना मुली मिळत नसल्याने बहुतांश तरुणांचे वय वाढत आहे. आई- वडील मुलाच्या लग्नाच्या नादात लग्न जमविणार्‍या मध्यस्थींच्या आहारी जात असल्याने काही नवरदेवांची अक्षरशः फसवणूक झाल्याच्या घटना अकोले तालुक्यात घडल्याने लग्न करणार्‍या तरुणांना आता ‘शुभ मंगल सावधान,’ असे म्हणण्याची वेळ ओढवली आहे. मुलगी नको, वंशाला दिवा मुलगाच हवा, या हट्टापायी राज्यात मुलींचे प्रमाण कमी आहे. गेल्या दोन- तीन वर्षांपासून मुलांना लग्नास मुली मिळत नसल्याचे खरं चित्र पहायला मिळत आहे.

परिणामी बहुतांश मुले लग्नाविना असल्याने दिवसेंदिवस वय वाढत आहे. मुलाचे लग्न होत नसल्याने काळजी करणारे आई-वडील मुलासाठी नव वधुच्या शोधात असतात. लग्न जमविणारे मध्यस्थी किंवा काही मंडळी पैशाचा सर्रास वापर करीत नव वधू शोधून देताना दिसतात. या संधीचा फायदा लग्न जमविणारे काही एजंट घेतात. नववधुचे स्थळ दाखविण्याचा देखावा करतात.

अगदी सिनेमाला लाजवेल अशी बनावट कथानक ऐकवत एकच मुलगी खूप मुलांना दाखवितात. मुलीचे मामा, आई, वडील, काका, मावशी होण्याचे तात्पुरते वास्तव मध्यस्थी टोळी करताना दिसते, मात्र नववधू मिळविण्याच्या नादात मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित लग्न लावून, दुसर्‍याचे आयुष्य बरबाद करून काही दिवसात मुलगी घरातील दागिने, पैसा, वस्तू घेऊन पसार होते.

नवीन सावजाच्या शोध घेत पुन्हा नववधू बनून दुसरे लग्न करून पैसा मिळविल्याची चर्चा झडत आहे, मात्र मुलाच्या आई- वडिलाची पैशासह नावही खराब होते. पुरावा नसल्याने अनेकदा फसवणूक झालेले पालक पोलिसात जात नाहीत. चार महिन्यांपुर्वी लग्न जमविणार्‍या मध्यस्थीने अकोल्यात एका नवरदेवाला पुजा समाधान देशमाने (रा. हुडको कॉलनी, येवला), सांडू यशवंत जाधव (रा. मह, ता. जि. बुलढाणा, हल्ली येवला), साहेबराव माधव डांगे (रा. बांबेरी वस्ती, कोर्‍हाळे, ता. राहाता), निकम बाबा (रा, कानमांनडळी, ता. वडाळी, जि. नाशिक) व सोनू खैरे या पाच जणांनी लग्नाच्या मोबदल्यात 2.50 लाख रूपये व नव वधुच्या अंगावरील साडेतीन तोळे दागिन्यां लांबवत फसवणूक केली. अकोले पोलिसांनी मध्यस्थींना अटक केली होती.

मुला – मुलीचे लग्न जमविताना फसवणूक होणार नाही, याची खात्री करावी. लग्न जमवून फसवणूक करणार्‍यांपासून सावध रहा. अशी फसवणूक होत असल्यास संपर्क साधा.

                                                 – मिथुन घुगे, स.पो. नि., अकोले.

 

Back to top button