नगर : महिला कर्मचार्‍यांनी वाचला तक्रारींचा पाढा! | पुढारी

नगर : महिला कर्मचार्‍यांनी वाचला तक्रारींचा पाढा!

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या एका विभागातील वरिष्ठ अधिकारी हे जाणीवपूर्वक मानसिक त्रास देत असल्याची तक्रार काही महिला कर्मचार्‍यांनी विभागप्रमुखांकडे केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या विषयाला संबंधित विभाग प्रमुखांनीही दुजोरा दिला आहे. जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी शिस्त लावली आहे. मात्र, हे करत असताना आतापर्यंत कधीही महिला कर्मचार्‍यांना त्रास दिल्याच्या तक्रारीही ऐकिवात नाहीत.

मात्र, एका विभागातील वरिष्ठ अधिकारी हे महिला कर्मचार्‍यांना जाणीवपूर्वक लेटमार्क देतात. याविषयी महिला कर्मचार्‍यांनी त्यांना विचारणा केल्यास, ते विभाग प्रमुखांकडे बोट दाखवितात. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी विभागातील 6 ते 7 महिला विभाग प्रमुखांकडे तक्रार घेऊन गेल्या होत्या. यावेळी हजेरी मस्टरवरून या महिलांनी कशा प्रकारे आपल्याला त्रास दिला जातो, हे सांगितले.

यात कधी सकाळी 10 वाजता येऊनही ते अधिकारी लेट मस्टर ठेवून जातात. स्वतः दुपारी 1 वाजता आल्यानंतर थेट 5 वाजता कार्यालयात येतात. पुरूष कर्मचार्‍यांना मात्र वेगळी वागणूक दिली जाते. यात स्वतःची बाहेरील बिले भरण्यासाठी क्यूआर कोड पाठवून कर्मचार्‍यांना भुर्दंड दिला जातो. त्यामुळे पुरूषांना काहीच नियम नाही, आम्हाला मात्र अशी वागणूक, असा तक्रारीचा पाढाच महिला कर्मचार्‍यांनी वाचला.

त्यावर विभाग प्रमुखांनी मी लेटमार्कबाबत कोणत्याही चुकीच्या सूचना केलेल्या नाहीत. तरीही असा प्रकार होत असेल, तर संबंधितांची कानउघाडणी केली जाईल, असे सांगून महिला कर्मचार्‍यांची समजूत काढली. मात्र, त्यावर समाधान न झाल्याने महिला कर्मचारी आता मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे जाणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

Back to top button