शेवगाव : गंगामाई कारखान्याची आग आटोक्यात; कोणतीही जीवितहानी नाही | पुढारी

शेवगाव : गंगामाई कारखान्याची आग आटोक्यात; कोणतीही जीवितहानी नाही

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : येथील गंगामाई साखर कारखान्याला लागलेल्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 17 ते 18 अग्निशामक बंबाच्या साहाय्याने शनिवारी पहाटे अडीचच्या दरम्यान आग आटोक्यात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शॉटसर्किटने ही आग लागल्याचा अंदाज आहे. यात कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे 70 ते 80 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रविवारी (दि.26) कारखाना स्थळावरील परिस्थिती पूर्वपदावर आली होती.

गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी सायंकाळी 6 वाजता आग लागली. यात पाहिल्या टाकीचा स्फोट झाल्यानंतर सर्व कर्मचारी सैरावैरा बाहेर धावू लागले. भडकती आग निदर्शनास येताच जवळच असलेल्या कर्मचारी वसाहतीतील कर्मचारी आपल्या कुटुंंबासह आहे त्या परिस्थितीत वाट मिळेल तेथून बाहेर पडले. कारखाना कार्यालय रिकामे झाले. पहिली, दुसरी, तिसरी टाकी अशी आग भडकत राहिल्याने आसपाच्या वस्तीवरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या आगीत सहा टाक्यांचा स्फोट झाला.

स्फोटात टाकीवरील अवजड झाकणे उडून पडली. आसपास असणार्‍या केबिनच्या काचा फुटल्या, तर काही गोदामाच्या भिंतींना तडे गेले. प्रकल्पाच्या छताचे पत्रे बाजूला उडाले. इथेनॉल वाहतुकीचा टँकर जळाला. प्रकल्प मशिनरीचे मोठे नुकसान झाले. पाथर्डी नगरपरिषद, वृद्धेश्वर कारखाना, केदारेश्वर कारखाना, ज्ञानेश्वर कारखाना, नाथ कारखाना, पैठण नगरपरिषद, प्रवरानगर, संगमनेर, अहमदनगर, जालना, गेवराई आदी ठिकाणाहून मदतकार्यास आलेल्या 18 अग्निशामक बंबांच्या साहाय्याने रविवारी पहाटे अडीच वाजता आग विझविण्यास यश आले.

दरम्यानच्या काळात 15 रुग्णवाहिका मदतकार्यासाठी हजर होत्या. शेवगाव येथील ग्रामीन रुग्णालयात डॉक्टर पथक तैनात झाले होते. तर, अनेक नागरिक मदतीसाठी धावले होते. प्रांताधिकारी प्रशांत मते, पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, तहसीलदार छगन वाघ, पोलिस निरीक्षक विलास पुजारी या ठिकाणी तळ ठोकून होते. दरम्यान, या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. रात्री निर्माण झालेले भितीचे वातावरण रविवारी पूर्वपदावर आले. कारखाना स्थळ गजबजले, ऊस वाहतुक सुरू झाली. कारखान्याचे बंद ठेवण्यात आलेले गाळप लवकरात लवकर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तिघेजण किरकोळ जखमी
आग लागल्याने उडालेल्या धावपळीत इथेनॉल टँकरचा चालक माणिक अप्पासाहेब गोरे, डिस्टीलरी ऑपरेटर अशोक अण्णासाहेब गायकवाड व पंडित नागनाथ काकडे हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. उपचारानंतर त्यांना लगेच घरी पाठविण्यात आले आहे.

जीवितहानीच्या उठल्या वावड्या
शनिवारी आगीच्या काळात सोशल मीडिया व अन्य प्रसिद्धी माध्यमांनी जीवितहानीच्या वावड्या उठविल्या. त्यामुळे कामगांराच्या नातेवाईकांनी कारखाना कार्यस्थळावर धाव घेतली. मात्र, कार्यकारी संचालक रणजित मुळे यांनी कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितल्यानंतर सर्वांच्या जीवात जीव आला.

Back to top button