नगर; पुढारी वृत्तसेवा : कॉलेजला जाण्यासाठी बुलेट घेऊन दिली नाही म्हणून मुलाने बापावरच उकळत्या कढईतील तेल ओतले. सावेडी उपनगरातील रुपामाता नगरात गुरुवारी (दि.23) ही धक्कादायक घटना उघडकीस आली. अनिरुद्ध अतुल गुप्ता, सुवर्णा अतुल गुप्ता (दोघे रा.रुपामाता नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या मायलेकाची नावे आहेत. याबाबत अतुल प्रकाश गुप्ता (रा.रुपामाता नगर, सावेडी) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अतुल गुप्ता हे शहरात एका ठिकाणी खासगी नोकरी करून कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. त्यांना समीर व अनिरुद्ध अशी दोन मुले आहेत. गुरुवारी रात्री अतुल यांनी भाजी तयार करण्यासाठी कढईत तेल टाकले होते. तेव्हा वडिलांनी 'तू कॉलेजला का जात नाही', असे मुलास विचारले. असे विचारल्याचा राग आल्याने मुलाने उकळत्या कढईतील तेल वडीलांच्या अंगावर ओतले. त्यानंतर काठीने मारहाण केली. 'आणखीन मार त्याला', असे म्हणत आईने मुलास फूस लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वडिलांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी माय-लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.