नगर : प्राध्यापकाच्या हत्येला ‘नाजूक’ किनार; हल्लेखोरांचे धागेदोरे लागेनात | पुढारी

नगर : प्राध्यापकाच्या हत्येला ‘नाजूक’ किनार; हल्लेखोरांचे धागेदोरे लागेनात

नगर; पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर येथील प्राध्यापकाची गोळी घालून हत्या होण्याला दोन दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापि हल्लेखोरांचे कोणतेही धागेदोरे पोलिसांना सापडले नसून, केवळ तपास सुरू आहे, असे साचेबद्ध उत्तर पोलिस प्रशासनाकडून देण्यात येत आहे. दरम्यान, तपासासाठी केडगाव बायपास रस्त्यावरील हॉटेल्स व इतर ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजचाही आधार घेतला जात आहे. हत्येमागे ‘नाजूक’ कारण असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

त्यादृष्टिनेही पोलिसांकडून तपासाची चक्रे फिरविली जात आहेत.श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या आरबीएनबी कॉलेजचे प्राध्यापक शिवाजी किसन ऊर्फ देवा होले (रा.कल्याणरोड, नगर) यांची गुरुवारी (दि.23) गावठी कट्ट्यातून गोळी झाडून हत्या करण्यात आली. होले यांचे मित्र व नातेवाईक अरुण नाथा शिंदे (रा.नेप्ती, ता.नगर) हे हॉटेलजवळ बसलेले असताना तीन लूटारुंनी पैशांसाठी होले यांच्यावर गोळी झाडून हत्या केली होती.

दरम्यान, होलेंच्या हत्येमागे लूटीचे कारण नसून ‘नाजूक’कारण असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे यांच्या जवळील तीन हजाराची रोकड हल्लेखोर घेऊन गेले. मात्र, हालेंच्या बोटातील सोन्याची अंगठी, पाकीट व मनगटी घड्याळ हल्लेखोरांनी नेले नसल्यानेही पोलिसांना ‘नाजूक’ संशय आहे. अरुण शिंदे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात हत्येचा व लूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

होले हळदीसाठी गेले होते नेप्तीला
शिवाजी होले हे त्यांचे मित्र अरुण शिंदे यांच्या पुतणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी नेप्ती येथे गेले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर शिंदे व होले दोघेही हॉटेलजवळच रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत ‘बसले’ होते.

Back to top button