शुभमंगल; तरुणांनो सावधान… नाही तर होईल फसवणूक, अकोलेत बनावट लग्न लावणारी टोळी सक्रिय .. | पुढारी

शुभमंगल; तरुणांनो सावधान... नाही तर होईल फसवणूक, अकोलेत बनावट लग्न लावणारी टोळी सक्रिय ..

अकोले (नगर), पुढारी वृत्तसेवा : सध्या अनेक मुलांना लग्नाची रेशीम गाठ बांधण्यासाठी मुलीच मिळत नसल्याने बहुतांशी मुलांचे वय होत आहे. तर आईवडील मुलाच्या लग्नाच्या नादात लग्न जमवणाऱ्या मध्यस्थीच्या आहारी जात असल्यामुळे नवरदेवाची फसवणूक घडल्याच्या घटना अकोले तालुक्यात घडत असल्याने लग्न करणाऱ्या तरुणांवर ” शुभमंगल सावधान ” अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

मुलगी नको, वंशाला दिवा हवा या हट्टापायी राज्यात मुलींचे प्रमाण खूप कमी आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी बहुतांशी मुले लग्नाविना असल्याने मुलाचे दिवसेंदिवस वय वाढताना दिसत आहे. आपल्या मुलाचे लग्न होत नसल्याच्या काळजीत आईवडील मुलासाठी नववधुच्या शोधात असतात. त्यामुळे लग्न जमवणारे मध्यस्थी किंवा काही विंवाह नोंदणी केंद्रात पैशाचा सर्रासपणे वापर करत नववधू मिळवताना दिसुन येतात. या संधीचा फायदा घेत लग्न जमवणारे एजंट अनेक नववधुचे स्थळे दाखवण्याचा देखावा करतात. सिनेमाला लाजवेल असे बनावट कथानक भासवत एकच मुलगी खूप मुलांना दाखवत मुलीचे मामा,आई, वडील, काका, मावशी होण्याचं तात्पुरते वास्तव मध्यस्थीची टोळी करताना दिसते. मात्र, मुलाचे मोजक्याच पाहुण्याच्या उपस्थितीत लग्न लावले जातात. काही दिवसातच मुलगी घरातील दागिने, पैसा, वस्तू घेऊन पसार होतात. नवीन सावजाचा शोध घेऊन पुन्हा नववधू बनून दुसरे लग्न करून पैसा कमवतात. यामध्ये मुलाच्या आईवडिलांची पैशाबरोबरच समाजात मानहानी होते. तसेच पुरावा नसल्याने अनेकदा फसवणूक झालेले पालक पोलिसात जायला तयार होत नाही.

विवाहयोग्य पालक आणि तरुणांची जागरुकता महत्त्वाची

विवाह योग्य तरुण जे वधू शोधतआहेत त्यांचा गैरफायदा घेण्यासाठी टोळ्या सक्रीय आहेत. तात्पुरत्या स्वरुपात वधू, आई, वडील, मामा, मामी यांची मध्यस्थी जुळवाजुळव करतात. त्याच भरवशावर तरुणांना अलगदपणे आपल्या जाळ्यात ओढतात. त्यानंतर छोटेखानी स्वरुपात लग्नविधी उरकतात आणि तेथूनच खरा फसवणुकीचा प्रकार सुरू होण्यास सुरुवात होते. आयुष्याची स्वप्ने रंगविण्याच्या नादात तरुण आनंदी असताना अचानक नववधू दागिने आणि पैशांसह पलायन करते. तिथेच तरुणांच्या स्वप्नांचा चक्काचूर होतो. अखेर नाईलाजाने पोलिसांत तक्रार दाखल करावी लागते. तर अनेकजण पुराव्यांअभावी पोलिसांत जायला धजावत नाहीत. त्यामुळे विवाहयोग्य पालक आणि तरुणांनी जागरुक राहूनच विवाहाचा निर्णय घेण्याची गरज आहे.

आपल्या मुला – मुलीचे लग्न जमवताना फसवणूक होणार नाही यांची खात्री करुनचं लग्न करावे. लग्न जमवुन फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे. लग्नाबाबत फसवणूक होत असल्यास अकोले पोलासाशी संपर्क साधण्याच्या आवाहन करण्यात आले आहे.
– सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, अकोले.

Back to top button