जामखेड : शिंदे-फडणवीसांचे शेतकर्‍यांचे सरकार : खासदार सुजय विखे | पुढारी

जामखेड : शिंदे-फडणवीसांचे शेतकर्‍यांचे सरकार : खासदार सुजय विखे

जामखेड; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना घरोघरी नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचा शब्द दिला, त्याच शब्दाची वचनपूर्ती सध्या सुरू आहे. मागील तीन वर्षांत राज्यात आघाडीचे सरकार असल्याने या योजनेंतर्गत कामे होऊ शकली नाहीत. मात्र, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच अवघ्या तीन महिन्यांंत जलजीवन मिशनची कामे युद्धपातळीवर सुरू झाली आणि पाणीयोजनेचा शुभारंभ सुरू झाला, असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले.

जामखेड तालुक्यातील अरणगांव, पिंपरखेड, जामखेडमध्ये जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन, तसेच जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्ग 548 डी च्या कामांचा प्रारंभ, तसेच राष्ट्रीय वयोश्री योजनेचे वाटप खासदार विखे यांच्या हस्ते व आमदार राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, बापूराव ढवळे, मनीषा मोहोळकर, डॉ झेंडे, सरपंच राजेंद्र ओमासे, अंकुश ढवळे, रवींद्र सुरवसे, सोमनाथ पाचारणे, सरपंच अंकुश शिंदे, पांडुरंग उबाळे, डॉ. भगवान मुरुमकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. खा. विखे म्हणाले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून अतिभार रोहित्र बदलून देण्यात येईल.

केंद्रात, राज्यात आणि कर्जत-जामखेड मतदारसंघातही डबल इंजिन सरकार असल्याने सर्व घटकांना न्याय देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार शिंदे म्हणाले, राज्यात व केंद्रात एकाच विचाराचे सरकार असून, राज्यासह देशाचा विकास साधण्यासाठी पुन्हा एका पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना बसवावे, असे आवाहन त्यांनी केले.

Back to top button