मढी : कानिफनाथांच्या संजीवन समाधीला लावले तेल | पुढारी

मढी : कानिफनाथांच्या संजीवन समाधीला लावले तेल

मढी; पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र मढी येथे यात्रेनिमित्त कानिफनाथांच्या संजीवन समाधीला पारंपरिक पद्वतीने तेल लावण्यात आले. अखंड मंत्रोच्चारात, नगारा, शंख ध्वनीच्या निनादात तेल लावण्याचा सोहळा भक्तीमय वातावरणात झाला. नाथांच्या जयजयकारात झालेल्या विधीमुळे गडावर वातावरण भक्तीमय झाले होते. मढी यात्रोत्सवानिमित्त शुक्रवारी दुपारी 4 वाजता देवस्थान समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी कानिफनाथांच्या चांदीच्या पादुकांची पूजा करून तेल लावण्याच्या विधीस सुरुवात केली.

यावेळी मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड, उपाध्यक्ष सचिन गवारे, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, विश्वस्त अर्जुन शिरसाठ, रवींद्र आरोळे, श्यामराव मरकड, कार्याध्यक्ष डॉ. विलास मढीकर, लक्ष्मण मरकड, भाग्येश मरकड, माजी सरपंच बाबासाहेब मरकड, देवीदास मरकड, नानाभाऊ मरकड, किशोर मरकड, नवनाथ मरकड, बाबासाहेब मरकड, व्यवस्थापक संजय मरकड, डॉ. रमाकांत मडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

शुद्ध पंचमीला नाथांच्या समाधीला तेल लावण्याचा विधी असतो. कुंभारांकडून मातीचे कोळंबे व पाच घट आणले जातात. त्यास नाडा बांधून त्यामध्ये तेल टाकले जाते. गुलाबपाणी, दूध, गंगाजल, हळद, चंदन पावडर, बुक्का, भस्म असे पदार्थ कालवून नाथांच्या संजीवन समाधीला तेल लावण्याचा पांरपरिक विधी केला जातो. तेल लावण्याची शेकडो वर्षाची परंपरा असून, प्रत्येक देवतांच्या उत्सवापूर्वी शुभ व धार्मिककार्याचा प्रारंभ तेल लावण्यापासून होतो. समाधीसह उत्सव मूर्तींना थंडावा राहून सुगंधी द्रव्याने तेलाभ्यंग होऊन केली जाणारी पूजा, यात्रेविषयची लगबग वाढविणारी ठरते.

गुढीपाडव्यापर्यंत ग्रामस्थ व्रतस्थ
तेल लावल्यानंतर गुढीपाडव्यापर्यंत ग्रामस्थ व्रतस्थ असतात. देवाला तेल लावल्यानंतर आजपासून घरात गोडधोड केले जात नाही. विवाहकार्याला जाणे नाही. शेतीची कामे बंद, दाढी-कटिंग, नवीन वस्त्र परिधान एवढेच नाहीतर स्वतःच्या घरात मंगल कार्य केले जात नाहीत.

Back to top button