नगर : सरकारी कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर | पुढारी

नगर : सरकारी कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर

नगर; पुढारी वृत्तसेवा : प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी व निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने 14 मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघाच्या जिल्हा शाखेने शुक्रवारी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे संपाची नोटीस देऊन, बेमुदत संपावर जाण्याचा शासनाला इशारा दिला आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांच्या सेवा नियमित करा, रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची पदे निरसित करू नका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या, अशा विविध मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत.

याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु शासनाने कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे 9 फेब्रुवारी रोजी मुंबई समन्वय समितीची तर 12 फेब्रुवारी रोजी नाशिकला मध्यवर्ती संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची सभा झाली. प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संपाचा पवित्रा घेण्यात आला.

त्यानुसार जिल्ह्यात संप शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, विजय काकडे, भाऊसाहेब डमाळे, विलास पेद्राम, पी.डी. कोळपकर, पुरुषोत्तम आडेप, सुरेश जेठे, गणेश जाधव, कविता वाळके, सुनील नागरे, राजेंद्र पावसे, मंगेश पुंड उपस्थित होते.

Back to top button