

नगर; पुढारी वृत्तसेवा : सन 2021-22 मधील सर्व कामे चांगल्या दर्जाची आणि तेही 15 मार्चपूर्वी पूर्ण झालेली पाहिजेत. अखर्चित रक्कम राहिल्यास जबाबदारी निश्चित करून अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी दिला आहे. जिल्हा परिषदेत शुक्रवारी कार्यकारी अभियंता, शाखा आभियंत, उपअभियंता, बांधकाम विभागातील लिपिक, सर्व विभाग प्रमुख यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत लांगोरे यांनी 21-22 मधील कामनिहाय आढावा घेतला. यामध्ये शाळा खोल्या, अंगणवाडी खोल्या बांधकामे, दुरुस्त्या, रस्तेकामे, पशुसंवर्धन दवाखाने, आरोग्य केंद्र, उपकेंद्र बांधकामे, त्याच्या, दुरुस्त्या इत्यादी कामांची लांगोरे यांनी सखोल माहिती घेतली.
कामाची स्थिती काय आहे, त्याला गती का मिळत नाही, यावरून लांगोरे यांनी काही अधिकार्यांवर ताशेरे ओढताना हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दमही भरला.
मला बाकी माहिती नाही, 2021-22 मधील सर्व कामे ही 15 मार्च पूर्वी पूर्ण झाली पाहिजेत, ती चांगल्या दर्जाची हवीत, त्यात कोणतीही तडजोड चालणार नाही, 31 मार्चनंतर जर अखर्चित रक्कम राहिली तर त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच ठेकेदार यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
दरम्यान, यावेळी कामात येणार्या अडचणी, त्यात काही ठिकाणी जागा नसल्याने कामे रखडली आहेत, काही ठिकाणी कायदेशीर पेच निर्माण झालेला आहे, यावरही चर्चा झाली. तब्बल 5 तास ही बैठक सुरू असल्याचे समजले. सर्व अभियंता व विभागप्रमुखांची बैठक घेतली असून, यात 21-22 मधील कामनिहाय आढावा घेतला आहे. 15 मार्चपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लांगोरे यांनी सांगितले.