नगर : ड्रॉईंग टीचर असल्याचे सांगून शाळांमध्ये चोरी | पुढारी

नगर : ड्रॉईंग टीचर असल्याचे सांगून शाळांमध्ये चोरी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शाळेच्या पटांगणात खेळत असलेल्या चिमुकल्या मुलींना ड्रॉईंग टीचर असल्याचे सांगून त्यांच्या कानातील सोन्याच्या रिंगांची चोरी करणार्‍या दोन तरुणींना तोफखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वडगाव गुप्ता रस्त्यावरील आठरे पाटील आणि तारकपूरमधील सेंट सेव्हिअर्स शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. वैष्णवी शुभम बडे (21, रा.पाईपलाईन रोड), वनिता राजेंद्र शिनगारे (25, रा.लक्ष्मीनगर, भिंगार) अशी अटक केलेल्या दोन आरोपी तरुणींची नावे आहेत. आठरे पाटील पब्लिक स्कूल या शाळेत सोमवारी (दि.20) सकाळी आरोपी वैष्णवी शुभम बडे हिने पटागंणात खेळत असणार्‍या काही मुलींना बाथरूमध्ये नेऊन त्यांच्या कानातील व नाकातील सोन्याच्या धातूच्या रिंगा काढून घेतल्या. वैष्णवी हिने लहान मुलींना, मी तुमची ड्रॉईंग टीचर आहे, असे सांगून त्यांच्या रिंगा कटरच्या सहायाने काढून घेतल्या.

हा प्रकार इयत्ता दुसरीत शिकणार्‍या एका चिमुकलीने मुख्याध्यापक व शिक्षकांना सांगितल्याने शाळेत खळबळ उडाली. असाच प्रकार तारकपूरमधील सेंट सेव्हिअर्स शाळेत घडला असून, आरोपी वैष्णवी बडे व तिची साथीदार वनिता शिनगारे या दोघींनी चार मुलींच्या कानातील सोन्याच्या रिंगा चोरून नेल्या. आठरे पाटील शाळेतील चोरीबाबत मुख्याध्यापक गोरक्षनाथ बाजीराव भोर यांनी फिर्याद दिली असून, सेंट सेव्हिअर्स शाळेतील चोरीबाबत एका चिमुकलीचे वडील लॉरेन्स जेम्स गायकवाड यांनी फिर्याद दिली.

काही दिवसांपूर्वी मावशीच्या घरात चोरी
आरोपी वैष्णवी शुभम बडे हिने काही दिवसांपूर्वी तिच्या मावशीच्या घरातच चोरी केली होती. पोलिसांनी अटक केल्यानंतर तपासात ही बाब समोर आली आहे. दरम्यान, आता चोरीसाठी शाळांमधील चिमुकल्या मुलींनाच टार्गेट केल्याने पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे.

पोलिसांकडून तत्काळ आरोपींचा शोध
आरोपींना अटक करण्यासाठी तोफखाना पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबविली. दोन संशयित तरुणींना ताब्यात घेतल्यानंतर शाळेतील मुलींना बोलावून आरोपींची ओळख पटविण्यात आली. शुक्रवारी (दि.24) न्यायालयात आरोपींना हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन्ही शाळांनी घटनेची माहिती दिल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यात आला. दोन तरुणींना अटक केली असून, त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाईल.                                            – समाधान साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक, तोफखाना

Back to top button