नगर : महावितरण आंदोलन प्रकरण ; पोलिसांसमोर धक्काबुक्की झालीच कशी? पिंपळगावच्या शेतकर्‍यांचा प्रश्न | पुढारी

नगर : महावितरण आंदोलन प्रकरण ; पोलिसांसमोर धक्काबुक्की झालीच कशी? पिंपळगावच्या शेतकर्‍यांचा प्रश्न

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  महावितरणच्या जेऊर उपकेंद्रात पिंपळगावच्या संतप्त शेतकर्‍यांनी पोलिसांसमोर अधिकार्‍यांना जाब विचारत आंदोलन केले. पोलिस उपस्थित असताना अधिकार्‍यास धक्काबुक्की झालीच कशी? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
आंदोलन सुरू असताना एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सुमारे पाच ते सहा पोलिस कर्मचारी तेथे उपस्थित होते. पिंपळगावला चार दिवस शेतीपंपाची वीज नव्हती. तसेच, पाच महिन्यांपासून सिंगल फेज वीज नव्हती. तलावात अनधिकृत वीजपंप, कर्मचार्‍यांची मनमानी, शिवजयंतीच्या दिवशी वीज नाही, विजेअभावी शेतीचे झालेले नुकसान, यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी या बाबींचा जाब विचारण्यासाठी महावितरणच्या कार्यालयातील अधिकार्‍यांना धारेवर धरले होते.

नुकसानीमुळे शेतकर्‍यांनी रोष व्यक्त केला, पण धक्काबुक्की करण्याचा प्रश्नच नव्हता. आंदोलन शांततेत पार पडले आणि दुसर्‍या दिवशी शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस व अधिकार्‍यांनी त्याचवेळी गुन्हा दाखल करण्याची तसदी का घेतली नाही, असा सवाल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. मागण्यांकडे लक्ष विचलित करण्यासाठी हा सर्व प्रकार जाणीवपूर्वक घडवून आणला आहे काय? शेतकर्‍यांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात. महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई होणे गरजेचे असताना शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्यामागचे कारण काय? असा सवाल शेतकरी वर्गांमधून उपस्थित होत आहे.

Back to top button