कर्जत : पुढारी वृत्तसेवा : शिवजयंतीनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीचा थरार कर्जतमध्ये रंगला. स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हडपसरमधील अनुजा शेवाळे यांची बैलजोडी या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची विजेती ठरली. बैलगाडी शर्यत स्पर्धेची परंपरा जोपासण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेच्या दुसर्या पर्वाचे आयोजन शिवजयंती निमित्त करण्यात आले होते. या स्पर्धेला खा.शरद पवार यांच्यासह राजकीय नेते, बैलगाडा शर्यतप्रेमी स्पर्धेला उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन आमदार पवार यांच्या हस्ते झाले.
अंतिम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या बैलगाडी मालकाला 2 लाख 22 हजार 222 रुपये, सन्मानचिन्ह आणि मानाची गदा, तर द्वितीय आणि तृतीय आलेल्या विजेत्यांना अनुक्रमे 1 लाख 11 हजार 111 रुपये आणि 77 हजार 777 रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात आले.
तसेच, द्वितीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणार्या स्पर्धकांना अनुक्रमे 51 हजार 111, 41 हजार 111 आणि 31 हजार 111 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
राज्यभरातून 264 बैलगाडे सहभागी
राज्यभरातून 264 बैलगाडे या स्पर्धेत सहभागी झाले होते. या रंगतदार शर्यतीत अंतिम स्पर्धेत हडपसर येथील अनुजा नितीन शेवाळे यांनी विजेतेपद मिळविले. द्वितीय क्रमांक लोणंद येथील राजू मासाळ, तर तृतीय क्रमांक बदलापूर येथील अंश गवळी यांच्या बैलजोडीने मिळविला.