पाथर्डी तालुका : भाजपच्या उपोषणात राष्ट्रवादीची मध्यस्थी | पुढारी

पाथर्डी तालुका : भाजपच्या उपोषणात राष्ट्रवादीची मध्यस्थी

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : तीर्थक्षेत्र योजनेंतर्गत झालेल्या कामाचे व शहरा लगत असलेल्या नदीपात्रात नगरपरिषदेने कोट्यवधी रुपये खर्चून चालू केलेल्या बंदिस्त गटाराच्या कामांची चौकशी करावी, या मागणीसाठी काल भाजप कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन केले. राष्ट्रवादीचे सरचिटणीस अ‍ॅड प्रताप ढाकणे यांनी केलेली मध्यस्थी व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर गर्जे यांनी उपोषण मागे घेतले.

मात्र, भाजप कार्यकर्त्याच्या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते ढाकणे यांनी मध्यस्थी केल्याने नगरपरिषद वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला आहे. या आंदोलनाला सायंकाळी उशिरा ढाकणे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवशंकर राजळे, बंडू बोरुडे,चांद ममियार, संजय उदमले, बाळासाहेब घुले, तसेच अमोल गर्जे, राजेंद्र शेवाळे, सुनील पाखरे, अरविंद सोनटक्के, परवेज मणियार, अविनाश पालवे यांनी पाठिंबा दिला.

या आंदोलनाची दखल लांडगे यांनी घेत ते आंदोलनस्थळी आले. आंदोलकांनी हे काम तातडीने बंद करावे, तसेच या कामासंदर्भात आम्ही जिल्हाधिकार्‍यांची भेट घेणार असून, त्या नंतर आमचे समाधान झाले, तर हे काम पुन्हा सुरू करावे, असा पवित्रा घेतल्यानंतर लांडगे यांनी काम बंदचे लेखी आदेश देऊ शकत नाही. मात्र, तूर्त तुम्ही जिल्हाधिकार्‍यांची भेट घेईपर्यंत हे काम थांबवले जाईल, असे आश्वासन लांडगे यांनी दिले. त्यानंतर गर्जे यांनी आंदोलन थांबवले.

नदीमध्ये सध्या नगरपरिषदने गटारीचे बांधकाम सुरु केले आहे. ज्या नदीत हे काम सुरु करण्यात आले आहे, त्या नदीला पावसाळ्यात पूर येत असल्याने या ठिकाणी हे काम का करण्यात येत आहे, असा आक्षेप घेत गर्जे यांनी बुधवारी सकाळापासून नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषणास सुरवात केली. मात्र, भाजपच्या अंदोलानात राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांनी यशस्वी मध्यस्थ केली हा विषय शहरात चर्चेचा ठरला.त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Back to top button