नगर : शिक्षक भवनासाठी मुंबईत भूखंड देणार! मंत्री विखेपाटील यांची राज्यसंघाच्या अधिवेशनात घोषणा | पुढारी

नगर : शिक्षक भवनासाठी मुंबईत भूखंड देणार! मंत्री विखेपाटील यांची राज्यसंघाच्या अधिवेशनात घोषणा

नगर; पुढारी वृत्त्तसेवा : विविध कामांसाठी राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांना मुंबईला यावे लागते. त्यांना शिक्षकभवनासाठी मुंबईत भूखंड उपलब्ध करून देऊ, अशी घोषणा रत्नागिरी येथे पार पडलेल्या राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महाअधिवेशनात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. विशेष म्हणजे त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात भूखंड उपलब्ध झाल्याबरोबर शिक्षकभवन बांधण्याची जबाबदारी सरकार घेईल,अशी घोषणा केली, अशी माहिती राज्यसंघाचे नेते डॉ.संजय कळमकर व राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप यांनी दिली.

आबासाहेब जगताप म्हणाले, राज्यसंघाचे नेते संभाजी थोरात यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांचे राज्यपातळीवरील प्रश्न मांडले.त्याचा सविस्तर उहापोह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याच्या सक्तीची अट तत्काळ रद्द करण्याची घोषणा केली.

तसेच जुनी पेन्शन देण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा करून सर्व सरकारी शाळेतील मुलांना यापुढे सरसकट गणवेश दिले जातील असे आश्वासन दिले. शिक्षणमंत्री केसरकर यांनी शिक्षकांना हवे तिथे बदली दिल्यास त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील अशा धोरणाचा विचार सुरू असल्याचे सांगितले.

तसेच पगाराची रक्कम सरळ शिक्षकांच्यार खात्यावर जमा करणारी यंत्रणा उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सूतोवाच केले.
डॉ. कळमकरांनी अधिवेशन गाजवले! रत्नागिरी येथील असे अधिवेशन खर्‍या अर्थाने नगरकरांनी गाजवाल्याचे रावसाहेब सुंबे यांनी सांगितले. डॉ.संजय कळमकर यांनी आपल्या भाषणातून झुंड या कादंबरीतील काही दाखले देऊन उपस्थितांना आपल्या साहित्यप्रेमाची चुणूक दाखवली.

Back to top button