छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा विसर; ‘त्या’ ग्रामसेवकांना निलंबित करा, शिवसेना नेत्याची मागणी | पुढारी

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा विसर; ‘त्या’ ग्रामसेवकांना निलंबित करा, शिवसेना नेत्याची मागणी

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील काही ग्रामपंचायतींना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा विसर पडल्याने त्यांनी शिवजयंती साजरी केली नाही. या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी केली आहे. राहुरी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांना शिवसेना तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे व सहकार्यांनी समक्ष भेटून सांगितले की, शासनाच्या आदेशानुसार 19 फेब्रुवारी रोजी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी, असा महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश असताना राहुरी तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आलेली नाही.

राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघडच्या ग्रामपंचायत कार्यालयात 19 फेब्रुवारी रोजी कुठलाही कार्यक्रम घेण्यात आलेला नाही. ग्रामपंचायत ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय, पिंपरी अवघड ता.राहुरी येथे साजरी करण्यात आलेली नाही असे निदर्शनास आले आहे.

सदर ग्रामसेवकावर तत्काळ कारवाई करून निलंबित करावे. तसेच राहुरी तालुक्यातील ज्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये छत्रपती शिवजयंती साजरी झाली नसेल त्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात मागणी लांबे यांनी केली. याप्रसंगी शिवसेना तालुका संघटक अशोक तनपुरे, शेतकरी आ. ता. प्रमुख किशोर मोरे, महेश गटकळ, विकास लांबे, सचिन लांबे, ज्ञानेश्वर धसाळ, उपस्थित होते.

पोहच देण्यास कर्मचार्‍यांची टाळाटाळ
ज्यावेळी कारवाई करण्याचे पत्र गटविकास अधिकारी यांना देऊन शिवसेना पदाधिकारी टपाल विभागात पोहोच घेण्यासाठी गेले त्यावेळी उपस्थित कर्मचार्‍यांनी पोहोच देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे काही काळ शिवसेना पदाधिकारी संतापून राहुरी पंचायत समिती कार्यलयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Back to top button