नगर : 6423 कोटींचे ‘समृद्धी’ बजेट तयार..! नरेगातून 108 कामे घेणार | पुढारी

नगर : 6423 कोटींचे ‘समृद्धी’ बजेट तयार..! नरेगातून 108 कामे घेणार

नगर; पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे समृद्धी बजेट तयार करण्यात आले आहे. साधारणतः जिल्ह्यासाठी 6423 कोटींचे हे अंदाजपत्रक असून, यातून 13 कोटी 27 लाख संभाव्य मनुष्यदिन निर्मिती होणार आहे. मात्र, शासनाकडून बजेटमध्ये प्रत्यक्षात किती तरतूद होणार, याकडे लक्ष आहे. नरेगा अंतर्गत एकूण 262 कामे घेण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे सन 2023-24 अंतर्गत गावोगावच्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून समृद्धी बजेट तयार करण्यात आले आहे.

त्यात 108 समाविष्ट कामांचा नियोजन आराखडा आहे. हे बजेट जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले जाते. त्यानंतर शासनस्तरावरून एकूण आराखड्याच्या किमान 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी-अधिक प्रमाणात त्यास अंतिम मंजूरी मिळत असल्याचे सांगितले जाते. यावर्षीचा आराखडा हा उपजिल्हा कार्यक्रम अधिकारी सोनकुसळे यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आला आहे. मनरेगा आयुक्तांकडे हा आराखडा पाठविण्यात आला आहे. मार्चपूर्वी अंतिम आराखडा मंजूर होऊन नगर जिल्ह्यासाठी उद्दीष्ट प्राप्त होणार आहे.

मनुष्यदिन निर्मितीतून रोजगाराची संधी
यंदाच्या आराखड्यात 13 कोटी 27 लाख मनुष्यदिन निर्मिती होण्याचा अंदाज आहे. त्या माध्यमातून रोजगारांच्या संधीही प्राप्त होणार आहे. त्यासाठी मजुरांना 256 रुपये हजेरी दिली जात आहे.

100 कोटींपर्यंत उद्दिष्ट मिळणार?
सन 2021-22 या वर्षात जिल्ह्यात 60 कोटी 8 लाख 78 हजारांचा खर्च झाला होता. त्यानंतर सध्याच्या 2022-23 या आर्थिक वर्षात शासनाने केलेल्या तरतुदीनुसार 17 लाख मनुष्यदिननिर्मिती झाली होती. 31 मार्चपर्यंत हे उद्दीष्ट आहे. मात्र, नगर जिल्ह्याने फेब्रुवारीतच 97 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. आतापर्यंत 71 कोटींचा खर्च झाला आहे. त्यानंतर पुढील 23-24 चे बजेट हे एप्रिल 2023 पासून सुरू होईल.
त्यापूर्वीच साधारणतः 20 लाख मनुष्यदिनपर्यंत उद्दीष्ट प्राप्त होऊन त्यासाठी 100 कोटीपर्यंत शकते, असा अंदाज आहे.

‘शरद पवार’ ग्रामसमृद्धीचा विसर ?
महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना’ ही खर्‍याअर्थाने शेतकर्‍यांना फायदेशीर ठरत होती. यातून गोठ्यांसाठी निधी दिला जात. सहा जनावरांना 72 हजार रुपये मिळत असत. मात्र, काही महिन्यांपासून या योजनेला निधीच प्राप्त नसल्याने शेतकर्‍यांची निराशा झाली आहे.

नवीन कामांनाही भरीव निधी.!
यावर्षी तयार केलेल्या आराखड्यात काही नवीन कामांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये फुलशेती आणि फळशेतीला चालना देतानाच, बायोगॅस, रेशीम उद्योग, शाळा, अंगणवाडी संरक्षक भिंतीची कामे, अशा काही कामांचाही समावेश आहे. त्यासाठीही भरीव निधीची मागणी करण्यात आलेली आहे.

आराखड्यात कोण कोणती कामे!
वृक्षलागवड, सार्वजनिक विहिरी, समपातळी दगड बांध, नालाखोलीकरण, जलशोषक चर, संरक्षक भिंती, शालेय स्वयंपाकगृह, सार्वजनिक गोडावून, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शाळा-अंगणवाडी शौचालये, शेततळे, कुक्कटपालन, शेळीपालन, शेतीच्या बांधावर वृक्ष लागवड, नवीन सिंचन विहिर, दगडी बांध, परसबाग, भारत निर्माण सेवा, अंगणवाडी बांधकाम, बचत भवन, सिमेंट रस्ता इ.

Back to top button