नगर : गंजबाजार मार्केट बनले जनावरांचा गोठा ! सर्वत्र पसरले घाणीचे साम्राज्य | पुढारी

नगर : गंजबाजार मार्केट बनले जनावरांचा गोठा ! सर्वत्र पसरले घाणीचे साम्राज्य

सावेडी : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील सराफ बाजाराजवळ असलेल्या गंजबाजार भाजीमार्केटची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मोकाट जनावरांच्या सततच्या वावरामुळे जणूकाही मार्केट गोठा बनले आहे. तुंबलेल्या गटारी, सडलेला भाजीपाला, सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुर्गंधी, यामुळे परिसरातील व्यावसायिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महापालिकेकडून काहीच कारवाई होत नसल्याने व्यावसायिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहराला स्वच्छ, सुंदर शहर बनविण्याचे स्वप्न अनेकदा दाखविले गेले. त्यावर निवडणुका लढविण्यात आल्या. नगरपालिकेची महानगरपालिका झाली.

मात्र, स्वच्छ सुंदर शहराचे स्वप्न हे दिवास्वप्नच राहिल्याचे चित्र सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. कारण, शहराच्या मध्यवस्तीत तसेच मोठी बाजारपेठ असणार्‍या सराफ बाजारातील लाख मोलाच्या भाजीमार्केटमध्ये अस्वच्छता, तसेच येथील दुर्गंधीमुळे भाजीविक्रेते मार्केटमधील आपल्या जागेवर न बसता, बाहेरील रस्त्यावर बसून भाजी विक्री करतात. परिणामी, मार्केटमध्ये बोटावर मोजण्याइतकेच भाजी विक्रते असून, मार्केट ओसाड झाले आहे. त्यामुळे परिसरातील मोकाट जनावरे या ठिकाणी कळपाने वावरत असून, या जनावरांपासून नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.

येथील गटारीतून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने, गेल्या दोन वर्षांपासून गटारी तुंबलेल्या अवस्थेत आहेत. याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिका, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेला परिसरातील व्यापार्‍यांकडून मोठा कर प्राप्त होतो. तसेच, शहरासह जिल्ह्यातून ग्राहक या ठिकाणी खरेदीसाठी येतात. तरीही, या परिसरात दैनंदिन स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे. व्यावसायिकांना दुकानासमोर पडलेले मोकाट जनावरांचे शेण उचलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे स्वच्छता व आरोग्य विभागाची यंत्रणा समक्षपणे कार्यरत करून नागरिकांना चांगल्या सुविधा द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

मोकाट जनावरांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त पंकज जावळे यांनी देऊनही त्यास कोंडवाडा विभागाने केराची टोपली दाखविली. याबाबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मेल पाठवून गार्‍हाणे मांडण्यात आले. तरीही कारवाई होत नसल्याने व्यावसायिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अनेक गाळे बंद अवस्थेत

सदर मार्केट मध्ये 150 गाळे असून, महापालिका या गाळे धारकांकडून नाममात्र भाडे आकारते. अनेक गाळेधारकांकडे महापालिकेची मोठी थकबाकी आहे. मात्र, अनेक गाळे बंद अवस्थेत असून, त्यामध्ये टाकाऊ साहित्य ठेवून गाळेधारकांनी फक्त ते ताब्यात ठेवले आहेत

Back to top button