

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील प्रति जेजुरी समजल्या जाणार्या हिवरगाव पावसा येथील देवगड येथील खंडोबा देवस्थानच्या गाभार्याजवळ असणारी दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडण्याचा सोमवारी मध्यरात्री अयशस्वी प्रयत्न झाला. दानपेटी फोडण्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. त्यामुळे चोरट्याला पकडणे पोलिसांना सोपे जाणार आहे.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे प्रतिजेजुरी देवगड हे खंडोबा महाराजांचे देवस्थान आहे.
या देवस्थानच्या मंदिराच्या गाभार्याजवळ मोठी दानपेटी बसविलेली आहे. सोमवारी मध्यरात्री कोणीतरी अज्ञात दोन चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून पहारीच्या साह्याने दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ती दानपेटी फोडण्यात अपयश आले आहे. खंडोबा देवस्थान पुजारी बबन बाबुराव शिंदे हे देवपूजा करण्यासाठी मंगळवारी सकाळी मंदिरात गेले असता त्यांना दानपेटी फुटलेली असल्याचे आढळून आले. त्यांनी ही बाब तात्काळ देवस्थान ट्रस्टचे सचिव मोठ्याभाऊ बडे यांना कळविली. त्यांनी तत्काळ ही माहिती अध्यक्ष व सर्व विश्वस्तांना दिली सर्वांनी येऊन मंदिरात पाहणी केली असता दानपेटी फुटल्याचे आढळून आले. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.