नगरकरांना भेडसावते आहे कृत्रिम पाणीटंचाई | पुढारी

नगरकरांना भेडसावते आहे कृत्रिम पाणीटंचाई

नगर : पुढारी वृत्तसेवा :  सावेडी उपगनरामध्ये गेल्या महिन्यांपासून पाणी वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. नगरसेवकांनी तक्रारी करूनही प्रशासन ढिम्म आहे. शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याच्या आरोपानंतर उपायुक्त यशवंत डांगे यांनी आज सकाळी वार्ड 1 आणि 2 मध्ये पाहणी केली. दरम्यान, चार महिन्यांपासून पगार थकल्याने कंत्राटी वॉल्मन यांनी काम ंबंद करण्याचा इशारा दिला आहे. बोल्हेगाव, सावेडी, पाईपलाईन रोड आदी परिसरात गेल्या महिन्यापासून पाण्याच्या नावाने बोंबाबोंब आहे. अनेक भागात दहा दहा दिवस पाणी येत नाही. स्थायी समितीच्या सभेमध्ये नगरसेविका रुपाली वारे यांनी ठोस भूमिका मांडत पाणीप्रश्नांवर अधिकार्‍याचे वाभाडे काढले.

येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल असे जुजबी उत्तर अधिकार्‍यांनी दिले होते. त्यानंतर महासभेतही विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरूडे, नगरसेविका दीपाली बारस्कर, मीना चव्हाण यांनी पाणी प्रश्नावर अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. त्यांनी सभा चालू न देण्याचा इशारा दिल्यानंतर सोमवारी प्रभागात जावून पाहणी करण्यात येईल, असे आश्वासन महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिले होते. प्रभाग एक व दोनमध्ये उपायुक्त यशवंत डांगे यांनी सोमवारी-मंगळवार पाणीपुरवठ्याची पाहणी करून कर्मचार्‍यांना सूचना दिल्या.

दरम्यान, काल विदळ येथील ट्रान्सफार्मर जळाल्याने पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. रात्री उशिरा पाण्याच्या टाक्या भरण्याचे काम सुरू झाले. तरीही आज सकाळी उपनगरामध्ये काही भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होता. त्यामुळे अनेक नागरिकांना पाणी मिळाले नाही. नागापूर येथून केवळ दोन तास पंपिंगद्वारे उचलले जात असल्याने पाण्याची लेव्हल तयार होत नाही. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, असे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.

जुन्या-नव्या टाकीचे जजमेंट जुळेना
वसंत टेकडी येथील जुन्या पाण्याची टाकी दुरूस्तीसाठी घेण्यात आली होती. ती टाकी आता दुरूस्ती झाल्याने त्यात टाकी निम्मे पाणी टाकले जाते. तर, नव्या टाकीत निम्मे पाणी टाकले जाते. त्यामुळे कोणत्याच टाकीची लेव्हल मिळत नाही. त्यात पंपांची जोडणी नव्या टाकीला केलेली आहे. आता ती जुन्या टाकी करावयाची झाल्यास एक दिवस तरी पाणी उपसा बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे अद्याप तरी जुन्या-नव्या पाण्याच्या टाकीचे जजमेंट जुळत नसल्याचे समजते. येत्या शनिवारी पुन्हा शटडाऊन घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

वॉलमनचे पगार थकले, ठेकेदाराचे हातवर
पाणीपुरवठा विभागात कंत्राटी पद्धतीने सुमारे 104 वॉलमन काम करीत आहेत. त्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार नाही. त्यामुळे त्यांनी सोमवारी काम बंद ठेवले होते.परिणामी सर्वत्र पाणी वितरणाचा बोजवारा उडला. आज सकाळी सर्व कंत्राटी वॉलमन कामगारांनी आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली.

Back to top button