नगर : 72 वर्षांच्या आजोबांच्या जिद्दीपुढे प्रशासनही नमले ! मागणी पूर्ण झाल्यावरच सोडले उपोषण | पुढारी

नगर : 72 वर्षांच्या आजोबांच्या जिद्दीपुढे प्रशासनही नमले ! मागणी पूर्ण झाल्यावरच सोडले उपोषण

पोहेगाव : पुढारी वृत्तसेवा :  कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तात्पुरता एक शिक्षक व पाच मार्चला इतर शिक्षक मिळणार असल्याचे लेखी अश्वासन मिळाल्याने शाळेसमोर उपोषणास बसलेले 72 वर्षांच्या आजोबांनी आपले उपोषण सोडले आहे. गेल्या वर्षापासून तीन शिक्षकांची कमी असल्याने सोनेवाडी येथील बहात्तर वर्षाचे आजोबा अशोक घोडेराव हे आमरण उपोषणासाठी शाळेच्या गेट समोर बसले होते. शिक्षक मिळेपर्यंत माघार नाही, असा पवित्रा आजोबांनी घेतला होता. अखेर काल आजोंबा पुढे कोपरगाव शिक्षण विभाग व पंचायत समितीचे प्रशासन नमले गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी व गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी तात्पुरत्या स्वरूपात एका शिक्षकाची नेमणूक व पाच मार्चला दोन शिक्षक असे लेखी आश्वासन दिले.

उपोषणास बसलेले घाडेराव यांचा रक्तदाब वाढल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. गटविकास अधिकार्‍यांसमोरच त्यांनी त्यांची तपासणी केली असता घोडेराव यांचा बी पी 155 च्या पुढे गेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग मात्र प्रशासनाची धांदल उडाली आणि त्यांनी नमते घेत शाळेला एक शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून दिला. तसेच दोन शिक्षकांचे लेखी आश्वासन आजोबांच्या हातात टेकवले.

श्रीमती बीबी म्हसे यांना आंतरजिल्हा बदलीने या शाळेवर पदस्थापना देण्यात आलेली असून त्या मात्र शाळेवर अद्याप हजार न झाल्यामुळे ते एक पद रिक्त दिसत आहे. तर शाळेचे दुसरे शिक्षक दरेकर यांनी स्वेच्छा नेतृत्व निवृत्ती घेतल्याने ते एक पद रिक्त दिसत आहे. मुख्याध्यापकाचे एक पद रिक्त असल्याचे प्रशासनाने कबूल केले. रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला असल्याचे संगितले.

Back to top button