राहुरीत चोरट्यांचा उपद्रव; कृषिसेवा केंद्र फोडले | पुढारी

राहुरीत चोरट्यांचा उपद्रव; कृषिसेवा केंद्र फोडले

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील उंबरे येथे कृषिसेवा केंद्र, म्हैसगाव येथे दुकानफोडी तर मालुंजे खुर्द येथून बोकड चोरीला गेल्याच्या घटनेमुळे भुरट्या चोरट्यांचा उपद्रव समोर आला आहे. राहुरी तालुक्यातील उंबरे येथील कारभारी रघुनाथ ढोकणे यांच्या मालकीचे असलेले समाधान कृषी सेवा केंद्र चोरट्यांनी फोडले. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी उंबरे बसस्थानक परिसरातील कृषिसेवा केंद्राचे शटर उचकटले.

चोरट्यांनी कृषिसेवा केंद्र दुकानातील 2 हजार 800 रूपये किंमतीचे नॅटिओ नावाचे औषध, 5 हजार 880 रूपये किंमतीचे 1 लिटर वजनाचे ट्वेंटी फोर नावाच्या औषधाचे 12 नग, 10 हजार 200 रुपये किमतीचे मायकोराईजा नावाच्या औषधाचे 15 नग, 4 हजार 410 रुपये किमतीचे ताबा नावाचे औषधे, 3 हजार रुपये किमतीचे रिजेंट नावाचे औषध असा एकूण 50 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल दोन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहायक फौजदार चंद्रकांत बराटे हे करीत आहे.

यासह मालुंजे खुर्द येथे भुरट्या चोरट्यांनी दत्तात्रय यमाजी निकम यांच्या मालकीचे बोकड चोरून नेले आहे. 10 हजार रुपये किमतीचा तीन महिन्याचा असलेला बोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार राहुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पोलिस नाईक महेश भवार हे करीत आहेत. यासह चोरट्यांनी म्हैसगाव हद्दीतही धुमाकूळ घालत काही दुकानांसह घरांमध्ये चोरी केल्याची घटना घडली आहे. राहुरी हद्दीमध्ये भुरट्या चोरट्यांनी पुन्हा आपले डोके वर काढत सर्वसामान्यांवर अन्याय सुरू केला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Back to top button