अकोलेमधील 50 गावांची तहान भागणार | पुढारी

अकोलेमधील 50 गावांची तहान भागणार

अकोले; पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागाच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच पिण्याच्या पाण्याची वाढती तहान भागविण्यासाठी केंद्र सरकारने जलजीवन मिशन योजना सुरु केली. सन 2024 पर्यंत प्रत्येक घराला पाणी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्नपूर्तीसाठी खेड्यापाड्याची तहान आता भागविली जाणार आहे. अकोले तालुक्यातही जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 10 पाणीपुरवठा योजनांसाठी 233 कोटी 25 लाखांचा खर्च होणार असून लवकरच या योजना पूर्णत्वास जातील.

‘हर घर जल योजना’ आता राबणार असून अकोलेच्या आदिवासी वाडीवस्तीवर पाईपलाईनच्या माध्यमातून पिण्याचे पाणी घराघरात जाईल. जलजीवन मिशन अंतर्गत अकोले तालुक्यातील तहानलेल्या वंचित भागाची तहान आता भागणार असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे अहमदनगर जि. प. सदस्य आणि गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी दिली.

निळवंडे धरणातून अकोले, आगार अंबिकानगर, बहिरवाडी, ढोकरी, गर्दनी, कळस, खानापूर कुंभेफळ, म्हाळादेवी, मेहेंदुरी, निळवंडे, निंब्रळ, रेडे, सुगाव खुर्द, टाकळी, तांभोळ, उंचखडक खुर्द, आंबड, औरंगपूर, धामणगाव आवारी, इंदोरी, कळस बुद्रुक, मनोहरपूर, नवलेवाडी, परखतपूर, रुंभोडी, सुगाव बुद्रुक, सुलतानपूर, उंचखडक बुद्रुक, वाशेरे, धुमाळवाडी या 32 गावांची 70 कोटी 73 लाख खर्चाच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.

9 कोटी 85 लाख रुपये खर्चाच्या राजुर पाणीपुरवठा आणि एकदरे, चंदगीरवाडी,जायनावाडी,पिंपळदरावाडी, बिताका या 5 गावांची 6 कोटी 75 लाख. गणोरे, डोंगरगाव, वीरगाव, पिंपळगाव निपाणी, हिवरगाव आंबरे या 5 गावांची पाणीपुरवठा योजना (17 कोटी 70लाख). समशेरपूर घोडसरवाडी, नागवाडी, सावरगाव पाट (19 कोटी 51 लाख) या पाणीयोजनांचे काम प्रगतीपथावर असल्याची लेखी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अकोलेच्या उपविभागीय अभियंता यांनी दिली.

ब्राह्मणवाडा, कळंब, मण्याळे, खुंटेवाडी या 4 गावांची 22 कोटी 77 लाख रुपये खर्चाच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश नुकताच देण्यात आला आहे. केळी कोतूळ,सातेवाडी,खेतेवाडी (28 कोटी 7 लाख),मुथाळणे (24 कोटी 53 लाख), देवठाण (24 कोटी 93 लाख), तळे, विहीर, शिंदे, टाकळी या 4 गावांची (8 कोटी 40 लाख) पाणीयोजना मिळून चार योजनांची निविदा कार्यवाही पुर्ण झाली आहे.
लवकरात लवकर ही कामे पूर्णत्वास जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तहानलेल्या प्रत्येकास घरपोहच पाणी हे स्वप्न साकार होणार असल्याची माहितीही जालिंदर वाकचौरे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार तळातील सर्वसामान्य माणसाची काळजी घेणारे आहे. माझ्या देवठाण जि.प.गटात असलेले मुथाळणे गाव डोंगरदर्‍यात आहे. अहमदनगर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी पहिली टँकरची मागणी या गावात होते. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत या गावाला पाणी मिळाले नाही. आता या गावच्या पाणीपुरवठा योजनेची निविदा कार्यवाही पूर्ण झाली आहे. लोकसभा प्रवास अभियानांतर्गत केंद्रीय जलशक्ती मंत्री प्रल्हाद पटेल यांनी देवठाणच्या वाडीवस्तीवर भेट दिली. त्यांच्या पिण्याचे पाण्याची अडचण तत्काळ सोडविण्यात यावी, असे आदेश अधिकार्‍यांना दिल्याने कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला.

                                  – जालिंदर वाकचौरे, जि.प.सदस्य, देवठाण गट

Back to top button