पारनेर : शहीद कॅप्टन औटींना भावपूर्ण निरोप; लष्करी सेवेत असताना झाले निधन

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : आदर्श गाव राळेगण सिद्धीचे सुपुत्र कॅप्टन सौरभ भागुजी औटी यांना देशसेवेत असताना दोन दिवसापूर्वी वीरमरण आले. राळेगण सिद्धी येथे सोमवारी सकाळी त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कॅप्टन औटी हे जम्मू-काश्मीर येथे कार्यरत होते. कर्तव्यावर असताना मागील आठवड्यात लेह-लडाख भागात त्यांच्या वाहनाला अपघात झाला व त्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना त्यांचे शनिवारी निधन झाले.
त्यानंतर त्यांचे पार्थिव लष्करी विमानाने पुणे येथे व तेथून लष्करी वाहनाने राळेगण सिद्धी येथे आणण्यात आले. तेथे लष्कर व पोलिस अधिकार्यांनी मानवंदना दिली. यावेळी ज्येेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, खासदार डॉ. सुजय विखे, लष्करातील वरिष्ठ अधिकारी, प्रांताधिकारी अधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, गटविकास अधिकारी किशोर माने, राहुल शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर व मोठा जनसमुदाय उपस्थित होता.