

अळकुटी(ता. पारनेर ); पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून गोरगरीब गरजू लोकांना साहित्य वाटप, धान्य वाटप, तसेच लोकोपयोगी योजना राबवून त्यांच्या जीवनात समृद्धी देण्याचे काम केले. पंतप्रधान मोदी यांनी जगात भारत देशाला नावलौकिक मिळवून दिला असून, देशात विविध विकासयोजना मोठ्या प्रमाणात राबवून देश संपन्न केला असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील जलजीवन मिशनअंतर्गत एक कोटी 54 लाख रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच डॉ. कोमल भंडारी, उपसरपंच अरिफ पटेल, माजी उपसरपंच शरद घोलप, बाळासाहेब धोत्रे, लताबाई घोलप, मिरा शिरोळे, सचिन साखला, विशाल घोलप, राहुल शिंदे, संदीप वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ, भाजपचे तालुका अध्यक्ष वसंत चेडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख बंडू रोहकले, विश्वनाथ कोरडे, संजय मते, निजामुद्दीन मोमीन, नीलेश नरड आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वयोश्री योजनेअंतर्गत दीड हजार वृद्धांना साहित्य देण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, शैलेंद्र औटी, डॉ. भाऊसाहेब खिलारी, बाळासाहेब आवारी, भाऊसाहेब डेरे, नीलेश घोडे, प्रतिक वरखडे, अस्लमभाई इनामदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार डॉ. विखे म्हणाले, जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करत जेष्ठ नागरिकांची काळजी घेत त्यांना जीवनोपयोगी साहित्य देण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले. देशाची विकासाकडे वाटचाल होत आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना तुमच्या आशिर्वादाने मंत्रीमंडळात सर्वोच्च स्थान देण्यात आले.
यापुढील सहा महिन्यांत प्रत्येकाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी 'शासन आपल्या दारी' योजना राबवून जनतेला संपन्न करण्याचे काम आम्ही करणार आहोत. माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी अनेक वर्षे गरीब समाजाला आधार देत विकासाच्या रोजना राबविल्या आहेत. मात्र, जे त्यावेळी बरोबर होते ते आज विरोधी पक्षात आहेत. ते आमच्याबरोबर आले तर त्यांचे स्वागतच आहे.
मात्र, यासाठी मी त्यांच्याकडे जाणार नाही. यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना आपली भूमिका सांगण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
सचिन वराळ यांनी पाच वर्षांत जिल्हा परिषद, पंचायत समिती माध्यमातून केलेल्या कामांची माहिती दिली. या सहा महिन्यांत पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून जवळपास 60 कोटींची कामे मंजूर झाली असल्याची माहिती दिली. उत्तम घोलप यांनी सूत्रसंचालन केले. शरद घोलप यांनी आभार मानले.
शिवसेना-भाजप युतीची सुरुवात
आगामी काळात तालुक्यात शिवसेना-भाजप युतीची सुरुवात या व्यासपीठावरून करत असल्याचे सांगत ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतला व ज्यांच्यामुळे मी यशस्वी झालो असे अनेक लोक या ठिकाणी न आल्याने वेदना होतात. परंतु, ते ज्यांच्या भरवशावर बसलेत तेथे त्यांना काहीच मिळणार नसल्याचे विखे म्हणाले.
उपोषणकर्त्यांचा सन्मान
अळकुटी उपकेंद्रात पाच एमव्हीए क्षमतेच्या अतिरिक्त रोहित्राच्या मागणीसाठी दोन वेळा उपोषणास बसलेल्या अशोक शिरोळे व सहकार्यांचा खासदार डॉ. सुजय विखे यांनी सन्मान करत या रोहित्राचे श्रेय या उपोषणकर्त्यांचे असल्याचे सांगितले.