नगर : बाल शिवाजी, जिजाऊंनी वेधले लक्ष ! शिवजयंतीनिमित्त शेवगाव शहरात मिरवणुका | पुढारी

नगर : बाल शिवाजी, जिजाऊंनी वेधले लक्ष ! शिवजयंतीनिमित्त शेवगाव शहरात मिरवणुका

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात शिवजयंतीनिमित्त शहरात मिरवणुका काढण्यात आल्या.
बाल शिवाजी, बाल जिजाऊ वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी, महिला, पुरुष शिवभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते. शिवजयंतीनिमित्त शहरात आबासाहेब काकडे विद्यालय, बाळासाहेब भारदे विद्यालय, रेसिडेन्शिलय विद्यालय, ज्ञानदीप विद्या मंदिर, आदर्श कन्या विद्या मंदिर, निर्मल ब्राईट आदी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंग, झांज पथक, लेझिम पथकाच्या गजरात वेगवेगळ्या वेशभूषेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या मिरवणुका काढल्या. आंबेडकर चौक, क्रांती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या मिरवणुका सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. अनेक बालके छत्रपती शिवराय, जिजाऊ, मावळे यांच्या वेशभूषा करू न मिरवणुकीत सहभागी झाले होते.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने भगवेमय केलेल्या शेवगाव शहरातून पालखीत शिवरायांची मिरवणूक काढली होती. स्व. गोपीनाथ मुंडेे चौक, गाडगेबाबा चौक, आबेंडकर चौक, क्रांती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलेल्या या मिरवणुकीत वेगवेगळ्या वाद्यासह हजारो विद्यार्थी, महिला, पुरुष, शिवभक्त सहभागी झाले होते. क्रांती चौकात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरील तसेच शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्वांनी शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन केले. सर्वधर्मीय शिवभक्त त्यांच्या चरणी लीन झाले. शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीर, पोवाडा असे कार्यक्रम झाले. क्रांती चौकात सार्वजनिक शिवजयंती उत्सव मडंळाने आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. सायंकाळी येथे फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. शहरासह तालुक्यात गावागावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांच्या मिरवणुका काढण्यात आल्या.

Back to top button