नगर : जामखेड आगाराला कर्जतकरांचे वावडे | पुढारी

नगर : जामखेड आगाराला कर्जतकरांचे वावडे

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जामखेड आगाराकडून कर्जत तालुक्यावर सातत्याने अन्याय केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांंना अतोनात हाल सहन करावे लागत आहे. जामखेडहून कर्जतकडे येण्यासाठी दुपारी दोन नंतर एकही एसटी बस नाही. एवढेच नव्हे तर वारंवार निवेदन देऊनही चक्क जामखेड आगार व्यवस्थापन कर्जतकरांची फसवणूक करीत आहे. राज्यात दबदबा असलेले दोन आमदार असूनही, जनतेच्या पदरी मात्र निराशाच आहे. अखेर या जनतेला कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.

कर्जतला डेपो नसल्याने तालुक्याची वाहतूक करण्याची जबाबदारी ही जामखेड व श्रीगोंदा आगारांकडे आहे. जामखेड आगाराने कर्जत तालुक्यामधून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. कर्जतमधील जनतेने देखील एकच मतदारसंघ असल्यामुळे जामखेड आगाराला नेहमी प्राधान्य दिले आहे. मात्र, विद्यमान आगार व्यवस्थापकांच्या मनमानी कारभारामुळे कर्जतकरांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

कर्जत येथे डेपोचे काम सुरू आहे. मात्र, ते अजून पूर्ण झाले नाही. डेपो नसल्यामुळे खर्‍या अर्थाने तालुक्यातील जनतेचे हाल होत आहेत. डेपोचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण करून डेपो येथे सुरू करावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. जामखेडचे आगार व्यवस्थापक जाणीवपूर्वक दुपारी दोन नंतर कर्जतकडे एकही एसटी बस सोडत नाहीत. ते एवढ्यावरच थांबत नाहीत, तर त्यांनी राजकीय दबावाने एखादी एसटी बस सुरू करावी लागली, तर ती बस चार-पाच दिवस वेगवेगळ्या वेळेवर जाणीवपूर्वक पाठवून ती चालत नाही, असे कारणे देऊन बंद केली आहे. कागदोपत्री एसटी बस चालू असल्याचे देखील दाखविले आहे. एखादा अधिकारी धाडस करू शकतो, यावरून आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांनी याची गांभिर्याने दखल घेण्याची गरज आहे.

जामखेड आगार व्यवस्थापक जामखेड आगारांमधून अनेक ठिकाणी अनावश्यक बस पाठवत असल्याचे दिसून येते. या एसटी गाड्यांना प्रवाशांची संख्या देखील कमी असते. केवळ किलोमीटर पूर्ण करण्यासाठी बस पाठविल्या जात असल्याचे दिसतेे. एकीकडे प्रवाशांची मागणी असूनही बस पाठविली जात नाही आणि दुसरीकडे किलोमीटर पूर्ण करण्यासाठी तोट्यामध्ये एसटी बस चालविली जात आहे, हा प्रकार अतिशय गंभीर आहे कर्जत येथील दररोज ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या 40 ते 50 आहे. त्यांनी सहीनिशी जामखेड व नगर प्रशासनाला सायंकाळी सहा वाजता जामखेड येथून बस सुरू करावी, यासाठी निवेदन दिले आहे. असे असताना त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे एवढ्या प्रवाशांना मिळेल त्या वाहनांंमधून रोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

पंचवीस वर्षेे सुरू असलेली बस बंद
जामखेड-कवडाणे ही 25 वर्षांपूर्वीपासून सुरू असलेली एसटी बस जामखेड आगार व्यवस्थापकांनी बंद केली. ही बस सुरू असताना प्रवाशांची सोय होत होती. सकाळी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी देखील ही बस उपयोगी होती.

तीन दिवसांत बस केली बंद
सात फेब्रुवारीला जामखेड-बारामती बस सुरू केल्याचा फलक जामखेड बसस्थानकावर लावला होता. सायंकाळी साडेचार वाजता ही बस रद्द केल्याचे सांगितले. दुसर्‍या दिवशी सायंकाळी सहानंतर बस सोडण्यात आली आणि तिसर्‍या दिवशी उत्पन्न येत नसल्याचे कारण देत बंद करण्यात आली.

Back to top button