नगर : कार्यकर्ते अस्वस्थ; नगर काँग्रेस वार्‍यावर ! | पुढारी

नगर : कार्यकर्ते अस्वस्थ; नगर काँग्रेस वार्‍यावर !

संदीप रोडे :

नगर :  नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून मोठे वादळ उठले. बंडखोरी करत ते आमदारही झाले; मात्र दरम्यानच्या काळात नगर जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. आ. बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकमेकांच्या तक्रारी पक्षाध्यक्षांकडे करत कुरघोड्या केल्या. अखेर त्या पेल्यातील वादळ ठरल्या. मुंबईतील प्रदेश बैठकीत थोरात-पटोले मांडीला मांडी लावून बसले, चेहर्‍यावर बळजबरीचे हास्यही आणले. वरकरणी दोघांचे मनोमिलन झाल्याचे दाखविण्यात आले तरी बरखास्त नगर जिल्हा काँग्रेसबाबत शब्दानेही कोणी बोलले नाही. नव्याने जिल्हा कार्यकारिणी करण्याच्या हालचाली दृष्टिपथास येत नसल्याने या क्षणाला तरी नगर काँग्रेस वार्‍यावर असल्याचे चित्र आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान पटोले-थोरात यांच्या पक्षांतर्गत संघर्षात नगर जिल्हा कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी तडकाफडकी बरखास्त केली. बरखास्तीनंतर बहुतांश काँग्रेस नेते बंडखोर तांबे यांच्या पाठीशी उभे राहिले. पदवीधर निवडणुकी दरम्यान बंडखोर तांबे यांना पाठिंबा दिल्यामुळं बाळासाहेब साळुंके यांना जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदावरून काढलं गेलं. इतकेच नव्हे तर नानांनी जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बरखास्तीची घोषणा केली.

आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रभावाखाली जिल्ह्याची काँग्रेस होती, हेच त्यामागील कारण असल्याचे पदाधिकारी आजही खासगीत सांगतात. याच काळात नगर जिल्हा काँग्रेसची पडझड झाली. भाजपनेही तांबेंच्या मागे ‘शक्ती’ उभी केली. परिणामी ‘सत्य-जित’ झाली. निवडणूक काळात मौनात असलेल्या आ. थोरात यांनी संगमनेरात ‘काँग्रेस एकनिष्ठतेचा’ नारा देण्यासोबतच ‘कार्यकर्ते इकडे असल्याने सत्यजितला तिकडे करमणार नाही’ असे म्हणत आ. तांबे यांना घरवापसीची साद घातली. आ. थोरात काँग्रेस सावरण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे आ. सत्यजित तांबे यांनी ‘उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी। घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी’, असे सूचक ट्विट करत भविष्यातील वाटचालीचे संकेत देत मामांची साद अवहेरली. थोरात-तांबे हे जवळचे नातलग. त्यामुळे जिल्हा काँग्रेस जितकी थोरातांच्या प्रभावाखाली तितकीच ती तांबे यांनाही जवळची मानणारी आहे.

एकीकडे आ. थोरातांनी भूमिका म्यान करत एकनिष्ठतेची हाक दिली, तर दुसरीकडे तांबे यांची भूमिका वेगळीच.. अशा कात्रीत सापडलेली जिल्ह्यातील काँग्रेस मात्र अस्वस्थ आहेत. ‘क्या करे, क्या ना करे, ये कैसी मुश्किल है’ असा पेच जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. महसूलमंत्री, प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य अशा महत्त्वाच्या पदावरील आ. थोरात यांचे नगर होम ग्राऊंड असले तरी जिल्हा काँग्रेस सध्यातरी बिनकारभार्‍याची आहे. जिल्हा काँग्रेस आ. थोरातांच्या शब्दापुढे नाही, मात्र पटोले-थोरात यांच्या कुरघोडी राजकारणात नवी जिल्हा कार्यकारिणी होईल का?, झाली तरी त्यात आ. थोरात समर्थकांना स्थान मिळेल की जुन्या चेहर्‍यांना समोर केले जाणार?, या प्रश्नांनी कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. देशात काँग्रेस ‘हाथ से हाथ जोडो’चा नारा देत असताना इकडे नगरमध्ये मात्र झालेली ‘तोडातोडी जोडो’चे आव्हान उभे आहे. त्याचा शेवट कसा होणार यावरच नगर जिल्हा काँग्रेसचे भवितव्य ठरणार हे तितकेच खरे!

तांबेंची पावले चालती वेगळीच वाट
सत्यजित तांबे हे अपक्ष आमदार असल्याने ते मुक्त आहेत. मामाश्री आ. थोरात यांनी साद घातल्यानंतरही आ. तांबे सूचक ट्विट करून थांबले नाही तर त्यानंतरही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाचा माणूस म्हणत तोंडभरून कौतुक केले. तानसा पाणलोट क्षेत्रात तराफ्यावरून शिक्षणासाठी सावरदेव गावच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांनी मदत केल्याचे कारण आ. तांबे यांना त्यासाठी मिळाले. शिर्डीत रात्रीच्या विमानसेवेला परवानगी दिल्याबद्दल केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांचे आभार मानणारे ट्विटही आ. तांबे यांनी केले. थोरात-तांबे कुटुंबीयांच्या एकनिष्ठतेवर शंका घेण्याचे कारण नाही, मात्र नव्या दमाचे आ. सत्यजित यांचे वेगळ्याच वाटेवर पाऊल टाकण्याचे हे संकेत तर नव्हे ना. अशीही शक्यता आता बळावू पाहते आहे.

 

Back to top button